मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत घ्या; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी
By मनोहर कुंभेजकर | Published: October 31, 2023 01:06 PM2023-10-31T13:06:10+5:302023-10-31T13:06:59+5:30
भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅड.आशिष शेलार यांच्या आदेशाने सिनेटच्या निवडणुका एप्रिलमध्ये घेण्याचा घाट घातला आहे.असा गंभीर आरोप देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच नवीन वेळापत्रक जाहीर झालं असून नवीन वेळापत्रकानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक आता एप्रिल मध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.मात्र एप्रिल मध्ये निवडणुका घेण्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला असून एप्रिल ऐवजी तातडीने डिसेंबर अखेर पर्यंत निवडणुका घ्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी एका पत्राद्वारे राज्यपाल रमेश बैस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका एप्रिल मध्ये होणार असून, या निवडणुकांमुळे मार्च,एप्रिल व मे मध्ये विद्यापीठाच्या 475 विभागाच्या परीक्षांवर मोठा परिणाम होईल. आणि साहजिकच त्यात विद्यार्थी भरडला जाईल. आधीच सीनेट सदस्य नसल्याने विद्यार्थ्यांची अनेक प्रश्न व प्रलंबित कामे अडखळून पडली आहेत.असं ॲड.मातेले यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात म्हंटल आहे.
मतदार याद्यांत कोणत्याही चुका नसल्याचे त्यासाठी नेमलेल्या समितीने जाहीर करूनही पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करण्याचा घाट घालत पदवीधर सिनेट निवडणुका या जाणीवपूर्वक एप्रिल महिन्यापर्यंत खेचून नेण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार अँड.आशिष शेलार यांच्या आदेशाने सिनेटच्या निवडणुका एप्रिलमध्ये घेण्याचा घाट घातला आहे.असा गंभीर आरोप देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
दरम्यान,विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका एप्रिल महिन्याच्या ऐवजी डिसेंबर पर्यंत निवडणूक घेऊन थेट मुंबई विद्यापीठाचे पदवीधर विद्यार्थ्यांना नोंदणी न करता मतदानाचा हक्क द्यावा.अशी मागणी देखील ॲड.अमोल मातेले यांनी केली असून त्यांच्या मागणीवर राज्यपाल आणि विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेतायत हे पाहावं लागेल असे त्यांनी सांगितले.