मुंबई- मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट(एमटीए)चे संचालक योगेश सोमण यांच्या भोंगळ कारभाराला कंटाळून एमटीएच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात 13 जानेवारी 2020, सकाळी 10 वा. सुमारास तीव्र आंदोलन सुरू केले, आमदार कपिल पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, आंदोलनाची तीव्रता लक्ष्यात घेता विद्यापीठ प्रशासनाने योगेश सोमण यांना तात्काळ रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. असे लेखी पत्र मध्यरात्री 11:30 सुमारास विद्यापीठ कुलसचिव डाॅ. अजय देशमुख यांनी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केले.
मुंबई विद्यापीठातील 'एमटीएच्या' विभागात संचालक योगेश सोमण यांचा भोंगळ कारभार सुरू आहे. एमटीएच्या एमएला 25 विद्यार्थी घेण्याचे नियम असताना 60 विद्यार्थी कोणत्या नियमानुसार घेतले. तसेच डिप्लोमामध्ये देखील 50 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला. आम्हा विद्यार्थ्यांवर एक विशिष्ट विचारधारा थोपवली जात आहे , की ते ज्या विचाधारेतून येतात, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आम्हाला योग्य प्रकारे नाट्यशास्त्राचे शिक्षण दिले जात नाही, नाट्यशास्त्रावर योगेश सोमण यांनी वादग्रस्त टिप्पणी केली होती. शिक्षण देणारे हंगामी शिक्षक हेच मुळात नाटकाचे शिक्षण देण्याच्या पाञतेचे नाहीत, अश्या शिक्षकांकडून आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते आहे, असे आरोप विद्यार्थ्यांनी आंदोलनात केले. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी भोंगळ कारभार करणा-या एमटीएचे संचालक योगेश सोमण यांच्या पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
काल सकाळी 10 वा. सुमारास सुरू झालेले आंदोलन मध्यराञी 11 वाजेपर्यंत अधिक तीव्र होत गेले. मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थिनी आणि एमटीएच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी याला पाठिंबा दर्शविला. मुंबईतील शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेतला.
आमदार कपिल पाटील म्हणाले, योगेश सोमण या विद्यापीठातून जात नाही, तोपर्यंत आपले आंदोलन चालू ठेवा, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढत गेली. तीव्र होत चाललेल्या आंदोलनाची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने कुलसचिव डाॅ. अजय प्र. देशमुख यांनी सत्यशोधक समितीचे गठण तातडीने करण्यात येईल. समितीचे कामकाज होईपर्यंत संचालक योगेश सोमण यांना तत्काळ रजेवर पाठविण्यात येत असल्याचं समितीनं सांगितलं. उपरोक्त चौकशीचा अहवाल येत्या चार आठवड्यात सादर केला जाईल, असे लेखीपञ आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते एमटीएच्या विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.