Join us

राजपथवर चमकणार मुंबई विद्यापीठ; चार विद्यार्थ्यांची संचलन पथकात निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 11:32 PM

‘कोरोनाच्या परिस्थितीमध्येही सामाजिक कार्याचे कर्तव्य पार पाडत एनआरडीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे.

रोहित नाईकमुंबई : प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनामध्ये यंदाही राष्ट्रीय सेवा योजनाचे (एनएसएस) विशेष पथक सहभागी होणार आहे. देशभरातून निवड झालेल्या या पथकामध्ये मुंबई विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. १९८८ सालापासून राजपथवरील संचलनात एनएसएस पथकाचा समावेश करण्यात आला आणि तेव्हापासून एकदाही मुंबई विद्यापीठाचा सहभाग चुकलेला नाही, हे विशेष.कोरोनाच्या सावटामुळे विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयातील निवडक विद्यार्थ्यांची कलिना येथे निवड शिबीरातून चाचणी घेतली. यातून प्रतिककुमार राय (आर. डी. नॅशनल महाविद्यालय), प्रग्यानिधी यमहन (एम. एल. डहाणूकर विद्यालय), प्रगती शेट्टीगर (के. व्ही. पेंढरकर महाविद्यालय) आणि प्रिया यादव (ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स) या चार विद्यार्थ्यांची एनआरडीसाठी निवड झाली.

‘कोरोनाच्या परिस्थितीमध्येही सामाजिक कार्याचे कर्तव्य पार पाडत एनआरडीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा अभिमान आहे. मुंबई विद्यापीठाची शान यंदाही राजपथावर दिसून येईल,’ असे मुंबई विद्यापीठ एनएसएसचे संचालक सुधीर पुराणिक म्हणाले. ‘कोरोनामुळे एनआरडी शिबिर आयोजनाबाबत शंका होती. केंद्राकडून सूचना आल्यानंतर आम्ही तयारी केली. हे सर्व करत असताना कोरोनाच्या निर्देशांचे पालन केले. महाराष्ट्रातून एकूण १४ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यात मुंबई विद्यापीठाचे ४ विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे,’ असे मुंबई विद्यापीठ एनएसएस विभागाचे कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

‘एनएसएस’अंतर्गत वैद्यकीय क्षेत्राला हातसामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहणाऱ्या एनएसएस विभागाने कोरोनाविरुद्धच्या लढाईतही खारीचा वाटा उचलला. मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयांनी एनएसएस अंतर्गत आतापर्यंत १३८ रक्तदान शिबीरांचे आयोजन करुन सुमारे १० हजारांहून अधिक युनिट रक्त गोळा करत वैद्यकिय क्षेत्राला मदतीचा हात दिला. हे करत असतानाच मुंबईच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचीही (एनआरडी) तयारी केली.

टॅग्स :प्रजासत्ताक दिनमुंबई विद्यापीठ