मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संकुल २० मेपर्यंत निवडणूक आयोगाकडे
By रेश्मा शिवडेकर | Published: May 15, 2024 04:17 PM2024-05-15T16:17:15+5:302024-05-15T16:18:48+5:30
मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुलातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लोकसभा निवडणुकीच्या कामाकरिता निवडणूक आयोगाकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
व्यायाम, बास्केट वॉल, स्क्वॅश, बॅडमिंटन इत्यादी खेळांकरिता वापरात असलेले मुंबई विद्यापीठाचे कलिना संकुलातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स लोकसभा निवडणुकीच्या कामाकरिता निवडणूक आयोगाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. या संकुलाला लागून असलेल्या धावण्याच्या ट्रॅकवरही तात्पुरती शेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे, व्यायाम किंवा अन्य खेळांकरिता संकुलात येणाऱया विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते आहे.
ईव्हीएम मशीन्स ठेवण्याकरिता हे संकुल ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे येथे पोलिसांचा बंदोबस्तही आहे. याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्याकडे विचारणा केली असता , २० मे पर्यंत म्हणजे मतदान होईपर्यंत संकुल ताब्यात राहील, अशी माहिती दिली.
विद्यापीठाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मिळालेल्या निधीतून या संकुलाची उभारणी करण्यात आली. मात्र, निधीचा ओघ आटल्यानंतर संकुलात विविध प्रकारच्या खेळांकरिता दिलेल्या सुविधा एकतर अर्धवट अवस्थेत होत्या किंवा ज्या होत्या त्या वापराविना धूळ खात पडून होत्या. विद्यार्थी, शिक्षकांनी, विद्यार्थी संघटनांनी पाठपुरावा करून एकएक करत या सुविधा सुरू करवून घेतल्या. मात्र, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस हे संकुल निवडणूक आयोगाच्या ताब्यात जाते आणि यात खंड पडतो.
आताही या संकुलातील बॅडमिंटन, बास्केट बॉल खेळण्याकरिता वापरला जाणारा मल्टिपर्पज हॉल, स्क्वॅश रूम, व्यायामशाळा यांचा ताबा घेण्यात आला आहे. व्यायामशाळा वरच्या मजल्यावर हलविण्यात आली आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांना करता येतो, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. इतर खेळाच्या सुविधा वापरण्यास मात्र मज्जाव करण्यात आला आहे. मल्टिपर्पज हॉलमध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल इत्यादी खेळांसाठी सुविधा निर्माण कऱण्यात आल्या आहेत. मात्र त्या बंद आहेत.
ट्रॅकवर शेड
संकुलाच्या आवारात जॉगिंग ट्रॅक आहे. त्या ट्रॅकच्या मार्गातच मोठी शेड उभारण्यात आली आहे. त्यामुळे हा ट्रॅक वापरता येत नाही. सोमवारच्या वादळी वाऱ्यामुळे तर या शेडचा काही भाग कोसळून पडला.