सागरी संशोधनाचे दार होणार खुले; विद्यापीठात नवे शैक्षणिक केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:16 AM2021-02-08T05:16:03+5:302021-02-08T05:16:23+5:30
राज्यपालांच्या हस्ते आज होणार उद्घाटन
मुंबई : मुंबई विद्यापीठात या शैक्षणिक वर्षांपासून सागरी अध्ययन केंद्राला सुरुवात होणार आहे. राज्याचे राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता या केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन होणार आहे. मुंबई विद्यापीठात नव्याने स्थापन होणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठ उच्च शिक्षण आणि समुद्री अभ्यासाच्या संशोधनास प्रोत्साहन मिळणार आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या सागरी अभ्यास क्षेत्रांची दखल घेत या केंद्राने आंतरशाखीय विषयांवर भर दिला आहे.
सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज या केंद्राच्या माध्यमातून सागरी विकास आणि त्यासंबंधीचे गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन सागरी आव्हानांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विकासात्मक दृष्टिकोनातून मानव्यविद्या, कायदा, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा आंतरविद्याशाखीय माध्यमातून प्रशिक्षित केले जाणार आहे. या केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यास सन्माननीय उपस्थिती म्हणून नौदल प्रमुख ॲडमिरल करंबिर सिंह, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे हे उपस्थित राहणार आहेत. तर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, अधिष्ठाता तथा प्रभारी संचालिका सेंटर फॉर एक्सलेंस इन मेरिटाईम स्टडीज डॉ. अनुराधा मजुमदार आणि प्रभारी कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड हे उपस्थित राहणार आहेत.
सागरी अभ्यासाशी निगडित असंख्य क्षेत्रातील शैक्षणिक आणि संशोधन या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी या केंद्राची भूमिका महत्वाची असणार आहे. सागरी अध्ययन आणि समुद्राशी संबंधित विषयांवर काम करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना, संशोधकांना आणि धोरणकर्त्यांना या अध्ययन केंद्राची मोठी मदत मिळू शकेल. तसेच या क्षेत्रामधील कौशल्य वाढीस हातभार लागणार आहे. भारतीय तसेच परदेशी विद्यार्थ्यांना या केंद्रात प्रवेश घेता येणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या भौगोलिक परिक्षेत्राला ७२० किमीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे अशा वैशिष्ट्यपूर्ण सागरी अध्ययन क्षेत्रातील नवज्ञान निर्मिती, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सागरी अभ्यास व संशोधनासाठी एक समर्पित केंद्र म्हणून या केंद्राची स्थापना करणे आवश्यक असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले. या केंद्राच्या माध्यमातून मुक्त सागरी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करून सीएसआयआर आणि एनआयओच्या माध्यमातून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘डीप ओशिएन मिशन’ मध्ये सहभागी होण्यासाठी या केंद्राच्या मार्फत प्रयत्न केले जाणार असल्याचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
केंद्रासाठी सल्लागारांची समिती
या केंद्रासाठी सल्लागार म्हणून नेव्ही, मर्केंटाईल शिपिंग अँड कॉमर्स, मेरीटाईम स्ट्रॅटेजी, मेरीटाईम लॉ, मेरीटाइम हिस्ट्री, मेरीटाईम आणि सागरी विज्ञान आणि तंत्रज्ञान इत्यादी नामांकित आणि प्रख्यात सल्लागारांची एक समितीही नेमण्यात आली आहे. त्यामुळे झपाट्याने विकसित होणाऱ्या सागरी अध्ययन केंद्राचे महत्व लक्षात घेऊन विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. सागरी अध्ययनाच्या माध्यमातून या क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन विकसित आणि विस्तारीत करून राष्ट्रीय वृध्दी आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि या केंद्राच्या प्रभारी संचालिका डॉ. अनुराधा मजुमदार यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून या केंद्राकडून अभ्यास केंद्रांना सुरुवात केली जाणार आहे.