विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचे मुंबई विद्यापीठात उमटले पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 06:29 AM2019-12-17T06:29:51+5:302019-12-17T06:30:03+5:30

छात्रभारतीसह अनेक विद्यार्थी संघटनांचा सहभाग

Mumbai University student angry over police action against students in jamia | विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचे मुंबई विद्यापीठात उमटले पडसाद

विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईचे मुंबई विद्यापीठात उमटले पडसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नागरिकत्व सुधारणा विधेयक, जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण तसेच एएमयू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद मुंबईच्या विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये उमटत आहेत. या लाठीचार्जचा निषेध नोंदविण्यासाठी छात्रभारती संघटनेने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. या आंदोलनात सर्व विद्यार्थी संघटना, प्राध्यापक आणि पुरोगामी सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले. शांत व लोकशाही मार्गाने विधेयकाचा निषेध करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचाराचा मार्ग अवलंबला गेला. सर्व घडामोडींची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करून, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी मुंबईतील विद्यापीठाच्या कालिना संकुलात निदर्शने करणाºया विद्यार्थी संघटनांसह विद्यार्थ्यांनी केली. या आंदोलनात छात्रभारती, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन, सीवायएसएस, एसएफआय, एसआयओ, एनसीपी युथ विंग, एआयएसएफ, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच इतर संघटना, पुरोगामी आणि संविधानवादी विद्यार्थी संघटना सहभागी झाल्या होत्या. २५०० पेक्षाही जास्त विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झालेल्या या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग आणि तुषार गांधी यांनीही सहभाग घेतला. या वेळी ‘देश वाचवा, संविधान वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.
सीएए हा कायदा भारताच्या राज्यघटनेच्या भावनेविरुद्ध असून भारतीयांमध्ये भेदभाव निर्माण करणारा आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानसारख्या शेजारच्या देशांमधून भारतात स्थायिक झालेल्या मुस्लीम वगळता प्रत्येकाला नागरिकत्व देण्याचा हा प्रस्ताव आहे. ही कृती सर्वसमावेशक नसून भारताच्या मूळ घटनेच्या विरोधात आहे. धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्राला तडा जाऊन जातीय ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचा हा एक भाग आहे. त्यामुळेच आमच्यासोबत इतर भारतीय जनता अशा फाळणीच्या राजकारणाला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया समता कला मंचच्या सुवर्णा साळवे यांनी आंदोलनादरम्यान दिली.
‘सीएए, एनआरसी धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध’
सीएए आणि एनआरसी धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहेत आणि देश तोडण्यासाठी आणले गेले आहेत. हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटनेविरुद्ध राबविण्याचा अजेंडा आहे. सरकार विद्यार्थ्यांना का घाबरत आहे, असा सवाल उपस्थित करीत पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया छात्रभारती राष्ट्रीय संघटनेचे सचिन बनसोड यांनी दिली.

Web Title: Mumbai University student angry over police action against students in jamia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.