Join us

मुंबई विद्यापीठ : विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दिलासा, प्रवेशासाठी मुदत वाढविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 2:55 AM

मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. पण अजूनही मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयात विद्यार्थी गुणपत्रिका सादर करू शकत नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. पण अजूनही मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले नसल्यामुळे प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयात विद्यार्थी गुणपत्रिका सादर करू शकत नाहीत. अशा सर्व विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडून दिलासा मिळाला आहे. महाविद्यालयात गुणपत्रिका सादर करण्याच्या मुदतीत आता ३१ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे.मुंबई विद्यापीठात यंदा मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन सुरू आहे. आॅगस्ट महिना अर्धा संपूनही १ लाख २० हजारांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी झालेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना निकाल मिळालेले नाहीत. २२ आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका महाविद्यालयांमध्ये सादर करायच्या होत्या. पण १५ आॅगस्टची मुंबई विद्यापीठाची डेडलाइन चुकल्यानंतर तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मुदतीत वाढ केली आहे.व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची मूळ प्रत ३१ आॅगस्टपर्यंत सादर करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत गुणपत्रिकेची मूळ प्रत मिळणार नाही, अशा विद्यार्थ्यांनी आॅनलाइन पद्धतीने मिळणारे गुणपत्रक संस्था अथवा महाविद्यालयाला सादर करायचे आहे. विद्यापीठाच्या रजिस्टरमधूनही गुणांची पडताळणी केल्याचे हमीपत्र सादर करावे लागणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी सांगितले.अशा आहेत नवीन तारखाएमबीए, एमएमएस आणि एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी २४ आॅगस्ट ही शेवटची तारीख आहे. तर एमई, एमटेक, एम.फार्मसी, एम.आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ३१ आॅगस्ट शेवटची तारीख आहे.पुनर्मूल्यांकनाचा प्रश्न जैसे थे!दरम्यान, मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळामुळे पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका द्याव्या लागल्या तर? या प्रश्नाने विद्यार्र्थी त्रस्त झाले आहेत. विद्यार्थांना त्रास होऊ नये, म्हणून आॅनलाइन पुनर्मूल्यांकन अशी नवीन पद्धत विद्यापीठ सुरू करणार होते, पण शनिवारीही ही प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे सूत्रांकडून समजते.निकाल गोंधळ लक्षात घेता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पुनर्मूल्यांकनासाठी नवी प्रणाली सुरू करण्यात येईल, समिती गठीत होईल, असे सांगण्यात आले. पण अजूनही समिती गठीत केलेली नाही. त्यामुळे निकाल कधी लागणार आणि पुनर्मूल्यांकनाचे काय? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. विद्यापीठाने सायंकाळी७ वाजेपर्यंत ८ हजार ४९५ उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे.