Mumbai University Bomb Scare: मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास विद्यापीठ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक विद्यार्थी असल्याचं अखेर निष्पन्न झालं आहे. बीकॉमचा निकाल रखडल्यामुळे मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थ्यानं शिवीगाळ करणारा एक ईमेल विद्यापीठाला पाठवला होता. यात कॅम्पस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. सायबर पोलिसांनी या ईमेलचा माग काढल्यानंतर सदर ईमेल एका बीकॉमच्या विद्यार्थ्यानं केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला समज आणि नोटिस देऊन सोडलं आहे.
बीकॉमच्या एका विद्यार्थ्यानं मुंबई विद्यापीठाच्या ईमेलवर कॅम्पस बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल सायबर केफेतून पाठवला होता. संबंधित मेल खोट्या माहितीच्या आधारे एका बनावट ईमेल आयडीवरून पाठविण्यात आल्याचं उघडकीस आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा मागोवा घेत ईमेल पाठवलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले. विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यानंच ई-मेल पाठवल्याचं कबुल केलं. मात्र तो विद्यार्थी असून मानसिक तणावातून त्यानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर पोलिसांनी नोटिस देऊन विद्यार्थ्याला सोडून दिलं आहे.