Join us

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याच्या पार्किंगकरिता मुंबई विद्यापीठाची जागा

By मनोहर कुंभेजकर | Published: October 01, 2022 5:25 PM

राष्ट्रवादी युवकचा तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बीकेसी येथील एम.एम.आर.डी.ए च्या मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा येत्या ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मेळाव्यासाठी येणाऱ्या निवासी संकुल आणि अन्य मोकळ्या जागेत वाहनांची पार्किंगची व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कलीना संकुलात करण्याचे काम महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर सुरु आहे. त्याकरिता येथील असंख्य उभ्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे, याबाबत प्रत्यक्ष स्थळी जावून हरकत घेतल्यानंतर तोडलेली झाडे व माती शेकडो डंपरमधून इतरत्र नेवून प्रकरण दडपण्याचे काम पालिकेच्या एच/पूर्व विभागाकडून सुरु आहे असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांनी केला आहे.

मुंबई विद्यापीठाची जागा ही विद्यार्थ्यांसाठी असून येथे राजकीय गटाच्या कार्यक्रमासाठी  पार्किंगची व्यवस्था करणे उचित होणार नाही. तसे केल्यास भविष्यात विद्यापीठाची जागा अशा राजकीय कार्यक्रमांना देण्याचा  पायंडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने  तीव्र हरकत घेतली आहे. विद्यापीठात सुरु असलेली झाडांची कत्तल आणि पार्किंग व्यवस्थेचे काम तात्काळ थांबविण्यात यावे अन्यथा दसऱ्याच्या दिवशी मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात एकही वाहन शिरू देणार नाही, असा ठोसव इशारा अ‍ॅड. अमोल मातेले यांनी दिला आहे.

याबाबत मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की दसरा मेळाव्याला पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती पालिका प्रशासनाने मुंबई विद्यापीठाला केली होती.त्यानुसार विद्यापीठाची मागची जागा अटी व शर्तींवर पालिकेला पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली.येथील झाडे तोडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत एच/ पूर्व विभागाच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथे गवत वाढल्याने येथे साप येतात. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून या शैक्षणिक संस्थेला मदत करण्यासाठी गेली ५ वर्षे आपण येथे वाढलेले गवत पालिकेतर्फे काढण्यात येते.

टॅग्स :दसराएकनाथ शिंदेकलिना विद्यापीठराष्ट्रवादी काँग्रेस