मुंबई विद्यापीठ कुलगुरू निवड : अंतिम पाच उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:45 AM2018-04-15T05:45:49+5:302018-04-15T05:45:49+5:30
मुंबईसह राज्यभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठी अंतिम ५ नावे राज्यपालांना सादर करण्यात आली.
मुंबई : मुंबईसह राज्यभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठी अंतिम ५ नावे राज्यपालांना सादर करण्यात आली. नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन तसेच सदस्य डॉ. श्यामलाल सोनी व भूषण गगराणी (उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सिडको) यांनी शनिवारी (दि. १४) राज्यपाल तथा कुलपती विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेऊन मुंबई विद्यापीठाच्या संभाव्य कुलगुरूंच्या नावाची यादी सादर केली. या उमेदवारांपैकी अंतिम उमेदवाराची निवड होणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून दूर केल्यानंतर नव्या कुलगुरू निवडीसाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. या शोधसमितीकडे आलेल्या एकूण अर्जांपैकी ३२ जाणांची निवड मुलाखतीसाठी करण्यात आली होती. यातील एकूण २४ जणांच्या मुलाखती शुक्रवारी नरिमन पॉइंट येथील सिडकोच्या कार्यालयात झाल्या तर उर्वरित मुलाखती शनिवारी पार पडल्या.
त्यानंतर दुपारी अंतिम पाच जणांची नावे शोधसमितीमार्फत राज्यपालांकडे सादर करण्यात आली.
सोमवारी नाव निश्चित होणार!
कुलगुरू पदासाठीच्या उमेदवारांपैकी निवड झालेले अंतिम पाच जण राज्यपालांकडे अंतिम सादरीकरण करतील व त्यानंतर अंतिम उमेदवाराची घोषणा केली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र सोमवारी हे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.