कोविड पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठ कागदपत्रे ई मेल स्वरूपात स्वीकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:07 AM2021-04-07T04:07:13+5:302021-04-07T04:07:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची विविध कारणांसाठी ये-जा सुरू असते. मात्र कोविड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील परीक्षा भवनात विद्यार्थ्यांची विविध कारणांसाठी ये-जा सुरू असते. मात्र कोविड काळात आणि विशेषतः रुग्णसंख्या वाढत असताना विद्यार्थ्यांच्या तसेच अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाकडून ५ विद्याशाखांच्या समस्यांचे निराकरण ई मेलवर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आता कालिना येथे परीक्षा भवनात निकालसंदर्भात, किंवा त्याच्यासंदर्भातील समस्यांसंदर्भात प्रत्यक्ष फेऱ्या मारण्याची गरज नसून ई मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन संचालक मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित नसणे, यापूर्वीची परीक्षा उत्तीर्ण नसणे, परीक्षेत उपस्थित नसणे, तसेच निकालात काही दुरुस्ती असणे अशा विविध कारणासाठी निकाल राखीव ठेवला जातो. याची दुरुस्ती करण्यासाठी संबंधित महाविद्यालय त्या विद्यार्थ्यांची बाब दुरुस्तीसाठी किंवा निकाल जाहीर करण्यासाठी त्याची कागदपत्रे जोडून विद्यापीठाकडे पाठविते किंवा ती कागदपत्रे घेऊन विद्यार्थी परीक्षा विभागाच्या निकाल कक्षात प्रत्यक्ष येत असतात. यासाठी त्यांना अनेकदा परीक्षा विभागाच्या फेऱ्या ही माराव्या लागतात. पण सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी प्रवास करून अनेकदा परीक्षा भवनात येणे हे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि तेथे कार्यरत अधिकाऱ्यांच्या दृष्टीने हितावह नाही. यामुळे संसर्ग पसरण्याची भीती अधिक आहे.
याच पार्श्वभूमीवर निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाणे यांनी निकाल कक्षाचे पाच ईमेल तयार करून विद्यार्थ्यांसाठी एक सुविधा निर्माण केली आहे आणि विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा विभागात न येता ती कागदपत्रे स्कॅन करून संबंधित विद्याशाखेच्या ई मेलवर पाठविण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान या ईमेलवर आलेली कागदपत्रे तपासून त्यावर कार्यवाही करूनच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे असे स्पष्ट करण्यात आपले आहे.
विद्याशाखा व त्यांचे ईमेल
१. कला शाखा निकाल कक्ष : artsresult34a@gmail.com
२. विज्ञान शाखा निकाल कक्ष :scienceresult34b@gmail.com
३. वाणिज्य शाखा निकाल कक्ष :commerceresult36@gmail.com
४. विधी शाखा निकाल कक्ष :lawresult29a@gmail.com
५. अभियांत्रिकी शाखा निकाल कक्ष :enggresult36a@gmail.com