मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना देणार एका दिवसात उत्तरपत्रिकेची छायाप्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 08:30 PM2024-02-01T20:30:37+5:302024-02-01T20:31:12+5:30
मुंबई : मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत एका दिवसात देण्यास सुरू केली आहे. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच ...
मुंबई : मुंबईविद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत एका दिवसात देण्यास सुरू केली आहे. विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याच दिवशी त्या विद्यार्थ्याच्या ईमेलवर त्याच्या विषयाची स्कॅन केलेली उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठविली जात आहे. याची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास विलंब लागत होता तो आता संपुष्टात आला आहे. तसेच आजपर्यंत मागणी केलेल्या उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती विद्यार्थ्यांना पाठविलेल्या आहेत
२०२३ च्या उन्हाळी सत्रापर्यंत पुनर्मूल्यांकनाचे अर्ज व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठीचे अर्ज ऑनलाईन मागविले जात होते. पण अर्ज केल्यानंतर त्याची छाननी करून त्याला उत्तरपत्रिकेची छायाप्रत पाठविली जात असे, याला विलंब लागत होता. तसेच पुनर्मूल्यांकनाच्या अर्जावरही कार्यवाही विलंबानेच होत होती. यावर विद्यापीठाने अशा स्वरूपाची संगणक प्रणाली विकसित केली.
पुनर्मूल्यांकनाचा निकालही झटपट
या प्रणालीद्वारे एखाद्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर फॉटोकॉपी व पुनर्मूल्यांकनाची एक लिंक उपलब्ध करून दिली जाते. या लिंकद्वारे विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्याक्षणी त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापकांना उपलब्ध होत आहे. यामुळे पुनर्मूल्यांकनाचा विलंबही यामध्ये कमी झाला आहे. तसेच उत्तरपत्रिकेची छायाप्रतही विद्यार्थ्यास एका दिवसात त्याच्या ईमेलवर उपलब्ध झाली आहे, अशी माहिती गुण व प्रमाणपत्रे विभागाचे उपकुलसचिव हिम्मत चौधरी यांनी दिली.
..........
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास व पुनर्मूल्यांकनास विलंब लागत होता. यासाठी मुंबई विद्यापीठाने ही प्रणाली विकसित केली या प्रणालीमुळे तो विलंब होणार नाही.
- डॉ. प्रसाद कारंडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ,
....
पुनर्मूल्यांकन व छायाप्रतीसाठी अर्जाची संख्या
हिवाळी सत्र
२०२२
पुनर्मूल्यांकन अर्जाची संख्या - ३०,६५७
छायाप्रतीसाठी अर्जाची संख्या - ६०००
...........
उन्हाळी सत्र
२०२३
पुनर्मूल्यांकन अर्जाची संख्या - ५८,६५९
छायाप्रतीसाठी अर्जाची संख्या - ११,०००