मुंबई विद्यापीठ लवकरच होणार डिजिटल
By admin | Published: June 22, 2016 02:31 AM2016-06-22T02:31:01+5:302016-06-22T02:31:01+5:30
विद्यापीठावर दिवसेंदिवस वाढणारा ताण, त्यामुळे विद्यार्थी, पालकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी अखेर मुंबई विद्यापीठ डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : विद्यापीठावर दिवसेंदिवस वाढणारा ताण, त्यामुळे विद्यार्थी, पालकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठी अखेर मुंबई विद्यापीठ डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी नवी यंत्रणा लवकरच येणार असून, त्याच्या सिस्टीम रिक्वायर्मेंट सर्व्हे (रफ र) सुरू असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया, परीक्षा आणि निकाल यांच्या नियोजनात नेहमीच गोंधळ उडतो. त्यात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या ७४५ हून अधिक झाल्यामुळे विद्यापीठावर कामाचा बोजा अधिक वाढला आहे. हा भार सुरळीतपणे पेलण्यासाठी विद्यापीठ स्तरावर सिस्टीम रिक्वायर्मेंट सर्व्हे(रफ र) सुरू आहे. राज्य शासनाच्या डीआयटी अर्थात डायरेक्टर आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतर्फे एसआरएस (सिस्टीम रिक्वायर्मेंट सर्व्हे) सुरू असून, या सर्व्हेसाठी तज्ज्ञांची समिती काम करीत आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठ स्तरावर तीन प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. या माध्यमातून प्रशासकीय कामांचे डिजिटलायझेशन करण्यात येणार असून, ई-निविदा मागवण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
अशी असेल यंत्रणा...
विद्यापीठातील नव्या यंत्रणेमुळे सर्व प्रशासकीय कामे आॅनलाइन करण्यात येतील. शिवाय प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन, आॅनलाइन माहितीचा पुरवठा अशा सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या फेऱ्या वाचतील, असा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
विद्यापीठ स्तरावर नवी अत्याधुनिक यंत्रणा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या विद्यापीठ स्तरावर सिस्टीम रिक्वायर्मेंट सर्व्हे (रफ र) सुरू आहे. या नव्या यंत्रणेमुळे प्रमाणपत्र, मान्यता, संलग्नता अशी महत्त्वपूर्ण कामे आॅनलाइन होतील. याचा फायदा नक्कीच होईल.
- डॉ. एम. ए. खान, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ