मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षाही ऑनलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 07:23 AM2020-11-20T07:23:34+5:302020-11-20T07:24:08+5:30
बहुपर्यायी, वर्णनात्मक प्रश्नांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या प्रथम सत्र हिवाळी परीक्षा या अंतिम वर्षाप्रमाणेच ऑनलाइन पद्धतीने होणार असून यात विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. परीक्षेसाठी एक तसाचा कालावधी दिला जाईल. बुधवारी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमान मंडळाने याबाबतच्या सूचना व परिपत्रक जारी केले. वाणिज्य, कला, विज्ञान या पारंपरिक शाखांच्या महाविद्यालयांची पदवी, पदव्युत्तर क्लस्टर महाविद्यालये अशी विभागणी केली असून त्यामध्ये लीड कॉलेज हे परीक्षेचे नियोजन करेल.
क्लस्टरमधील सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा एकाच वेळी ऑनलाइन घेण्यात येतील. पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या पदवी प्रथम सत्र परीक्षा ऑनलाइन माध्यमातून डिसेंबर ३१ पर्यंत घेण्यात येतील. पदव्युत्तर परीक्षेबाबत स्वतंत्रपणे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. हिवाळी सत्र परीक्षेसाठी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या परीक्षा ३१ डिसेंबरपर्यंत आयाेजित करायच्या आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा
१५ जानेवारीपर्यंत होतील. पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्राच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील.
ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नियमानुसार हिवाळी सत्राच्या या ऑनलाइन परीक्षा देणे शक्य हाेणार नाही अशा विद्यार्थ्यांची महाविद्यालयांनी नाेंद घेऊन त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी क्लस्टर महाविद्यालयांची असेल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षाही ऑनलाइन हाेतील.
असा असेल थीअरी परीक्षांचा पॅटर्न
nपारंपरिक (कला, वाणिज्य, विज्ञान) शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमसाठी १ तासात ६० गुणांची ऑनलाइन थीअरी परीक्षा.
n५० बहुपर्यायी प्रश्नांपैकी ४० प्रश्न सोडवणे बंधनकारक.
nव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (इंजिनीअरिंग, फार्मसी, एमसीए) २ तासांच्या ८० गुणांच्या थीअरी परीक्षेत, ४० गुणांचे बहुपर्यायी तर ४० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न सोडवणे बंधनकारक. प्रत्येकी १ तासाचा वेळ.
nविधि शाखेसाठी एकूण ६० गुणांच्या परीक्षेकरिता १ तासाचा वेळ. ३० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न तर ३० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न.
nआर्किटेक्चर शाखेची २० गुणांची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांची तर ३० गुणांसाठी वर्णनात्मक प्रश्नांची मिळून एकूण दीड तासाची परीक्षा.
प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षा १० डिसेंबरपासून
परीक्षा झाल्यानंतर शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन सुरू करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत. ज्या विषयांच्या इंटर्नल परीक्षा आहेत त्याचे गुण महाविद्यालयांनी २४ डिसेंबरपर्यंत विद्यापीठाला कळवायचे असून १० डिसेंबरपासून प्रात्यक्षिक, प्रकल्प, मौखिक परीक्षांना सुरुवात करायची आहे.