सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण संशोधन

By रेश्मा शिवडेकर | Published: January 25, 2024 03:17 PM2024-01-25T15:17:54+5:302024-01-25T15:18:07+5:30

सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक (नायट्राईड सेमीकंडक्टर) पदार्थ निर्माण कऱण्याचे उपकरण विकसित कऱण्यात आले आहे.

Mumbai University's innovative research in semiconductor manufacturing | सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण संशोधन

सेमीकंडक्टर निर्माण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण संशोधन

मुंबई : मुंबई विद्यापीठातील नॅनो विज्ञान आणि नॅनो तंत्रज्ञान विभागातील शास्त्रज्ञांनी सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्माण क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. सामान्य तापमानाला विशिष्ट अर्धसंवाहक (नायट्राईड सेमीकंडक्टर) पदार्थ निर्माण कऱण्याचे उपकरण विकसित कऱण्यात आले आहे.

या विभागातील डॉ. सुहास जेजुरीकर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करणाऱ्या संदीप हिंगे, वैभव कदम, ताहीर राजगोली, अक्षय परब या विद्यार्थ्यांनी नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या अभ्यासावर आधारित नवीन संकल्पना मांडून व अथक परिश्रम घेऊन नावीन्यपूर्ण असे एक उपकरण तयार केले आहे. ते सामान्य तापमानाला काम करते.

दैनंदिन जीवनात उपयोगी
सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात एक महत्वाचा घटक असून अनेक आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीचा आधार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात येणाऱ्या अनेक उपकरणांच्या निर्मितीत तो महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. उदा. संगणक, मायक्रोप्रोसेसर, मोबाइल, दुचाकी व चारचाकीसाठी लागणारी स्मार्ट उपकरणे, वैद्यकीय उपकरणे, नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रणाली आणि जगाला परस्पर जोडणारे संवादजाल.

महत्त्व का?
विशिष्ट चिप निर्मितीत नायट्राईड सेमीकंडक्टर हा अतिशय महत्वाचा घटक असतो. त्याचा वापर पॉवर इलेक्ट्रॉनिक, प्रकाश उत्सर्जन, दूरसंवाद, संदेशवहन, वाहन उद्योग, अंतराळ, आण्विक आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जातो. नायट्राईड सेमीकंडक्टर निर्माण हे उच्च तापमानावर अतिशय क्लिष्ट प्रक्रिया पार पाडून बनवण्यात येते. त्यासाठी विशिष्ट, गुंतागुंतीची आणि महागडी उपकरणे वापरली जातात. ही उपकरणे वापरण्यासाठी कुशल तज्ञांची आवश्यकता लागते. ह्यामुळे नायट्राईड सेमीकंडक्टर निर्माण ही अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक बाब आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या या नाविन्यपूर्ण उपकरणाद्वारे सामान्य तापमानाला नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्माण करून ह्या उपकरणाचा अगदी सहज वापर करता येईल. त्याचा वापर भविष्यातील लवचिक आणि परिधान करता येण्याजोग्या तंत्रज्ञानात करता येऊ शकेल.

पेटंटसाठी प्रयत्नशील
या संशोधनासाठी डॉ. सुहास जेजुरीकर ह्यांना भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (डी.एस.टी.) विभागाद्वारे अतिशय प्रतिष्ठित अशा टेक्नॉलॉजी ट्रान्सलेशन अवॉर्ड (टेट्रा) पारितोषिकाने २०२० रोजी गौरवण्यात करण्यात आले होते. जेजुरीकर आणि त्यांच्या विद्यार्थी समूहाने उपकरणाची सुधारित आणि व्यावसायिक आवृत्ती बनवली आहे. या संशोधनाकरिता पेटंट मिळवण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी या उपकरणाद्वारे बहुस्तरीय नायट्राईड सेमीकंडक्टर पदार्थ निर्मिती तसेच विविध प्रकारच्या नायट्राईड सेमीकंडक्टरच्या उत्पादनक्षमतेच्या चाचण्या सुरू आहेत.
 

Web Title: Mumbai University's innovative research in semiconductor manufacturing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.