मुंबई विद्यापीठाचेही आता मोबाइल अॅप
By admin | Published: July 2, 2015 03:50 AM2015-07-02T03:50:51+5:302015-07-02T03:50:51+5:30
डिजिटल इंडिया वीकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या वतीने नवीन अद्ययावत संकेतस्थळ व मोबाइल अॅप तसेच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या डेटा सेंटरचे अनावरण करण्यात आले.
मुंबई : डिजिटल इंडिया वीकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या वतीने नवीन अद्ययावत संकेतस्थळ व मोबाइल अॅप तसेच अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या डेटा सेंटरचे अनावरण करण्यात आले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजन वेळुकर यांच्या हस्ते बुधवारी आभासी वर्गखोलीमध्ये (व्हर्च्युअल क्लासरूम) हा समारंभ पार पडला.
विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध माहितीचे स्रोत उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये प्रत्येकाला घरबसल्या स्मार्टफोनवर एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे अद्ययावत संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यापीठ विभाग, सलग्न महाविद्यालयांची माहितीही उपलब्ध होणार आहे.
स्मार्ट मोबाइल अॅप विद्यापीठाने तयार केले असून, त्याला अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. हे अॅप विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता आहे. या अॅपवर विद्यार्थ्यांना प्रवेशप्रक्रिया, परीक्षा अर्ज, हॉलतिकीट, आसनव्यवस्था, निकाल, पुनर्मूल्यांकनाचे निकाल, वेळापत्रक, अभ्यासक्रम, विविध कोर्सेस, दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे प्रवेश, निकाल, विविध चर्चासत्रे व विद्यापीठाविषयीची माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असून, महत्त्वाची परिपत्रके सुध्दा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच येथे लवकरच मॅप्स, दिशा व आॅनलाइन पेमेंट गेट वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाचे हे अधिकृत मोबाइल अॅप असून, ते अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर कार्यरत असणार आहे.