मुंबई विद्यापीठाचा नावलौकिक कायम राहील ..!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 05:10 PM2018-07-18T17:10:04+5:302018-07-18T17:10:24+5:30
स्वतःची एक वेगळी ओळख वेगळी गरिमा असलेल्या ह्या विद्यापीठाने आज 18 जुलैला 162 वर्ष पूर्ण केली आहेत. या
सीमा महांगडे
मुंबई : मुंबईच्या अनेक आकर्षणांपैकी आणि देशातील जुन्या आणि मातब्बर विद्यापीठापैकी एक अशी ओळख असलेले मुंबई विद्यापीठ...! स्वतःची एक वेगळी ओळख वेगळी गरिमा असलेल्या ह्या विद्यापीठाने आज 18 जुलैला 162 वर्ष पूर्ण केली आहेत. या विद्यापीठांमधून अनेक नामवंतानी पदवी संपादन करून देशाचे नाव लौकीक केले आहे. मागील वर्षी विद्यार्थ्यांचा निकाल रखडवून सतत बातम्यांमध्ये असणाऱ्या विद्यापीठाची निकालाची गाडी यंदा सध्या रुळावर येतेय हे या वर्धापन दिनाचे विशेष...! नवीन कुलगुरू,प्र कुलगुरू , तंत्रज्ञानाचा आधार घेऊन लावण्यात येणारे निकाल आणि अधिसभा , व्यवस्थापन सभेचे नवीन सदस्य या साऱ्याचमुळे मुंबई विद्यापीठाचा ढासळलेला शैक्षणिक दर्जा पुन्हा उंचावणार अशा अपेक्षा या वर्धापन दिनाच्या निमित्ताने करण्यात येत आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, संगणाकाधारीत मूल्यांकन पद्धती, विविध प्राधिकरणांची ओळख त्यांचे कामकाज, विविध बैठकांचे कालबद्ध नियोजन- अंमलबजावणी, विद्यापीठाचे नवीन उपक्रम आणि प्रशासकीय संरचना अशा इतर आनुषांगिक बाबींसंदर्भात विद्यापीठाकडून ठोस कृती कार्यक्रमाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
परीक्षा विभागाचा कठीण प्रश्न
मुंबई विद्यापीठासमोरील सध्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे परीक्षा विभागातील गोंधळ. याकडे नवीन कुलगुरूंनी लक्ष देणे गरजेचे आहे. मागील वर्षी ऑनलाईन मूल्यांकनात झालेल्या घोळानंतर डॉ सुहास पेडणेकर याकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे पहायला मिळत आहेत. उन्हाळी सत्रात परीक्षा संबंधी केलेल्या विविध सुधारणांचा आढावा घेतला व येत्या हिवाळी सत्रात होणाऱ्या नवीन सुधारणेचा आढावाही ते घेत आहेत. परीक्षांचे निकाल वेळेवर लावणे ही माझी प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार उन्हाळी निकाल ४५ दिवसांत लावण्यात त्यांना यश मिळाले आहे. तरी परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये वारंवार करावे लागणारे बदल, प्रश्नपत्रिकांमध्ये होणाऱ्या चुका, त्यामुळे विद्यार्थ्यांना होणार मनस्ताप याकडे ही लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल.
अनेक नवीन अभ्यासक्रम, अत्याधुनिक यंत्रणा असं सगळं विद्यापीठात आहे. काही वर्षापूर्वी याच मुंबई विद्यापीठाचा लौकिक असा होता की, जगातील टॉप २०० विद्यापीठांमध्ये मुंबई विद्यापीठाचा नंबर लागत होता. मात्र आता हेच विद्यापीठ जागतिक यादीतून केव्हाच बाहेर फेकले गेले आहे. नवीन कुलगुरूंमुळे पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीत येण्याच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रयत्नाला बळ मिळत असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे या १६२व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या अपेक्षाही उंचावल्या आहेत.
विद्यापीठाला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्यात पण आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे, परंतु आताच्या स्थितीत आणि आधीच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर नवे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांच्या पुढे आव्हानांचा डोंगर उभा आहे. अनेक अडथळे आहेत, वाट काटेरी आहे. त्यांना काही महत्त्वाची कामं प्रथम युद्ध पातळीवर पार करावी लागतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा! परीक्षा यंत्रणा बदलणे, ऑनलाईन मूल्यांकनात तज्ज्ञांचा सहभाग करून घेणे, वेळेवर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, नॅकचे मूल्यांकन आणि संशोधन वाढविण्याचेही आव्हान आज त्यांच्या समोर आहे. एरव्ही सुद्धा मुंबईसारख्या प्रचंड व्याप असलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू पद सांभाळणे आव्हानात्मकच आहे. डॉ. सुहास पेडणेकर यांची प्राध्यापक, संशोधक म्हणून शैक्षणिक पार्श्वभूमी उत्तम आहे. रुईयासारख्या मुंबईतील पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते, त्यामुळे प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठी आहे. मुलांच्यात मिसळणारा प्राध्यापक म्हणूनच विद्यार्थ्यांचे ते ‘लाडके’ आहेत. त्यामुळेच डॉ. पेडणेकरांवर विद्यार्थ्यांच्या आणि तमाम मुंबईकरांच्या ‘आशा’ लागून आहेत. मुंबई विद्यापीठाला पुन्हा गतवैभव, जागतिक दर्जा आणि पहिल्या शंभरात स्थान मिळवून द्यावे, हीच नव्या कुलगुरूंकडून अपेक्षा!
आज मुंबई विद्यापीठ १६१ वर्हसे पूर्ण करून १६२ व्य वर्षांत पदार्पण करीत आहे. उच्च शिक्षणात मुंबई विद्यापीठाने जे स्थान मिळविले आहे, ते स्थान यापुढेही अबाधित राहील. विद्यापीठातील विद्यार्थी देशातच नाही तर जगाच्या पाठीवर सर्वदूर, सर्व क्षेत्रात नावलौकिक कमवीत आहेत. हीच परंपरा यापुढेही कायम राहील.
- डॉ सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापिठ
१६२ व्या वर्धापन दिना निमित्त कुलगुरूंचे निकाल वेळेत लावल्याबद्दल आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी सुरु असलेल्या मोर्चेबांधणीसाठी प्रथम अभिनंदन. एकंदरीत नवीन कुलगुरू आणि पूर्ण टीम उत्साहाने विद्यार्थ्यांसाठी कार्य करत असून लवकरच याचे उत्तम परिणाम दिसून येणार आहेत यात वाद नाही. निकालासह इतर शैक्षणिक कार्यक्रमणत ही कुलगुरू तातडीने कार्यरत आहेत यासाठी अभिनंदन.
प्रदीप सावंत, अधिसभा , व्यवस्थापन समिती सदस्य, मुंबई विद्यापिठ