Join us

मुंबई विद्यापीठाचा मनोरा ढासळला - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 06, 2017 7:32 AM

मुंबई विद्यापीठाच्या ढासळत्या दर्जाबाबत सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी टिप्पणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 6 - मुंबई विद्यापीठाच्या ढासळत्या दर्जाबाबत सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी टिप्पणी केली आहे. "सरकारचे लक्ष हे आता आपल्या विचारांचा वाहक असलेला माणूस कुलगुरूपदी बसवण्याकडेच आहे. कुलगुरू व कुलसचिवपदी आपापल्या लोकांना चिकटवले की सरकारचे काम संपते. ही भूमिका घातक आहे", असे सांगत उद्धव यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.  
 
कुलगुरूंच्या नेमणुका राजकीय दबावाने सुरू झाल्यापासून विद्यापीठांना वाळवी लागली. त्यातून मुंबई विद्यापीठाची दगडी इमारतही सुटलेली नाही, असेही सामनामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्तेमध्ये जी भयंकर घसरण झाली त्यामुळे मुंबई विद्यापीठाची उंची गुडघ्याएवढीही राहिलेली नाही, असाही उल्लेख उद्धव यांनी सामना संपादकीयमधून केला आहे.
 
काय सामना संपादकीय?
नाव मोठे आणि लक्षण खोटे असा काहीसा प्रकार जगविख्यात वगैरे मुंबई विद्यापीठाच्या बाबतीत सुरू आहे. मुंबई विद्यापीठाची आन, बान आणि शान गेल्या काही वर्षांत धुळीस मिळाली आहे. राजाबाई टॉवर विद्यापीठाच्या आवारातच आहे, पण मुंबई विद्यापीठाची उंची गुडघाभरही उरलेली दिसत नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्वोत्तम विद्यापीठांची यंदाची क्रमवारी जाहीर केली आहे. देशातील ‘टॉप १०’ विद्यापीठात मुंबई विद्यापीठास स्थान मिळालेले नाही, पण पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ‘टॉप १०’मध्ये स्थान मिळवून पुण्याचा शैक्षणिक लौकिक कायम राखला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे यासाठी मोठा राजकीय आणि सामाजिक संघर्ष झाला, पण डॉ. आंबेडकर या महान प्रतिभावान विद्वानाची प्रतिष्ठा मराठवाडा विद्यापीठाने राखलेली दिसत नाही. गुणवत्ता यादीत डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव कोठेच दिसत नाही. विद्वानांची नावे दिल्याने गुणवत्तेचे चार चाँद लागतातच असे नाही. ‘मुंबई’चे नाव खूप मोठे आहे. देशाचे आर्थिक केंद्र, आंतरराष्ट्रीय शहर वगैरे असले तरी विद्यापीठाचा दर्जा ढासळत आहे. सरकारचे लक्ष हे आता आपल्या विचारांचा वाहक असलेला माणूस कुलगुरूपदी बसवण्याकडेच आहे. कुलगुरू व कुलसचिवपदी आपापल्या लोकांना चिकटवले की सरकारचे काम संपते. ही भूमिका घातक आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाची जी अप्रतिष्ठा झाली आहे त्यास हेच निराश वातावरण जबाबदार आहे. कुलगुरूंच्या नेमणुका राजकीय दबावाने सुरू झाल्यापासून विद्यापीठांना वाळवी लागली. त्यातून मुंबई विद्यापीठाची दगडी इमारतही सुटलेली नाही.
 
अनेक कारणांनी वादात
राहिलेले दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ देशात सहाव्या स्थानावर आहे हे महत्त्वाचे; तर प. बंगालचे जादवपूर विद्यापीठ बाराव्या स्थानावर आले. मुंबई ‘आयआयटी’ला तिसरे स्थान मिळाले ते स्वतःच्या कर्तबगारीवर. पण विद्यापीठांच्या गुणवत्ता यादीत बंगळुरू, चेन्नई, तेलंगणा, कोईम्बतूर विद्यापीठे मुंबईच्या पुढे आहेत. दिल्ली आणि जादवपूर विद्यापीठात देशविरोधी घोषणा दिल्यामुळे ही विद्यापीठे बदनाम झाली. वामपंथी विद्यार्थी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत तेथे राडे झाले. तरीही ही दोन विद्यापीठे उत्तम कामगिरी बजावीत आहेत. यावर मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचे म्हणणे असे की, ‘या विद्यापीठांना अफझल गुरूवरून झालेला वाद वा देशविरोधी घोषणा दिल्याने अव्वल विद्यापीठात स्थान मिळालेले नाही तर विद्यार्थ्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ही विद्यापीठे झळकली आहेत.’ याचा अर्थ देशातील इतर विद्यापीठांची गुणवत्ता संशयास्पद आहे व पदव्या देणारे बेरोजगार निर्माण करणारे हे कारखाने बनले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीवर दिल्ली, जादवपूर, पुणे विद्यापीठांनी वरचा क्रमांक मिळविला. मग मुंबई विद्यापीठाला हे का जमले नाही? गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई विद्यापीठात भ्रष्टाचार, बजबजपुरी व परीक्षांच्या बाबतीत अराजक निर्माण झाले आहे. परीक्षा विभागाची पत घसरली आहे व आता तर पेपरफुटीने सगळेच मुसळ केरात गेले आहे. मुंबईचे शिल्पकार नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्या प्रयत्नांतून मुंबई विद्यापीठ उभे राहिले व विद्यापीठाशी अनेक विद्वानांची नावे जोडली गेली. १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. १८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाचे जे
 
व्यवस्थापक मंडळ
नेमले गेले त्यात तत्कालीन मुंबई सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश, मुंबईचे बिशप, मुंबईतील सैन्याचे कमांडर इन-चीफ, मुंबई कौन्सिलचे सभासद, डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन, सरकारी कॉलेजचे प्रिन्सिपल याखेरीज काही युरोपियन व हिंदुस्थानी गृहस्थांची संस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली. देशी सभासदांत सर जमशेटजी जिजीभाई, जगन्नाथ शंकरशेट, बोमनजी होमसजी, भाऊ दाजी लाड, महंमद युसूफ मुर्गे यांचा समावेश होता. १८६२ मध्ये विद्यापीठाचा पहिला पदवीदान समारंभ झाला. १८६२ मध्ये सहा देशी विद्यार्थ्यांची परीक्षा टाऊन हॉलमध्ये झाली. त्यात ज्यांना पदवी मिळाली ते रा. महादेव गोविंद रानडे, रा. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रा. बाळा मंगेश वागळे, रा. वामन आबाजी मोडक हे प्रामुख्याने होत. मात्र चांगले विद्यार्थी घडविण्याची मुंबई विद्यापीठाची परंपरा गेल्या काही वर्षांत मोडीत निघाली आहे. रानडे, भांडारकर सोडा, पण त्यांच्या आसपास फिरकू शकतील असेही कुणी निर्माण झाले नाही. खरे म्हणजे, विद्यापीठे ही ज्ञानोपासकांचे केंद्रे! विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला ज्ञानसंपन्नता, सांस्कृतिक संस्कार, करीअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक व्यावसायिक पात्रता मिळवून देण्याची जबाबदारी आमच्या विद्यापीठांवर आहे. विद्यापीठे म्हणजे विद्येचे आणि विद्वानांचे मुख्य स्थान होय व या सरस्वती मंदिरात शिरल्याबरोबर निरनिराळय़ा विषयांत पारंगत असलेले विद्वान जर दृष्टीस पडणार नसतील तर लोकांनी, सरकारने, युनिव्हर्सिटीने आपले कर्तव्य बजावले नाही असे म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाची उंची राजाबाई टॉवर आणि दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षाही जास्त होती. आम्हाला तर असे वाटले होते की, हे विद्यापीठ आयफेल टॉवरपेक्षाही उंची गाठेल. पण गेल्या काही वर्षांत गुणवत्तेमध्ये जी भयंकर घसरण झाली त्यामुळे मुंबई विद्यापीठाची उंची गुडघ्याएवढीही राहिलेली नाही. विद्यापीठाचा मनोरा ढासळला आहे.