मुंबई विद्यापीठाची ‘ती’ ट्रॉफी पुन्हा मागविणार
By admin | Published: March 4, 2016 02:03 AM2016-03-04T02:03:36+5:302016-03-04T02:03:36+5:30
म्हैसूर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे उपविजेतेपद मुंबई विद्यापीठाला घोषित केल्यानंतर स्पर्धेचे आयोजक असलेल्या म्हैसूर विद्यापीठातर्फे आता ती ट्रॉफी पुन्हा मागविण्यात येणार आहे
प्रवीण दाभोळकर, मुंबई
म्हैसूर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे उपविजेतेपद मुंबई विद्यापीठाला घोषित केल्यानंतर स्पर्धेचे आयोजक असलेल्या म्हैसूर विद्यापीठातर्फे आता ती ट्रॉफी पुन्हा मागविण्यात येणार आहे. सहभागी नसलेल्या स्पर्धेचे गुण आयोजकांनी दिल्यावर मुंबई विद्यापीठातर्फे तत्काळ योग्य भूमिका न घेतल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.
आयोजकांकडून आलेल्या ई-मेलनुसार उपविजेतेपद हे पंजाबच्या लवली विद्यापीठाला देण्यात आले आहे. समूहगीताचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मणिपूर विद्यापीठाऐवजी चुकीच्या गुणांमुळे मुंबई विद्यापीठाला देण्यात आले होते. सहभागी नसतानाही ज्या समूह गीत स्पर्धेत दिलेल्या गुणांसंबंधी मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक समन्वयकांद्वारे त्या वेळीच विचारणा का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आपण त्याचवेळी योग्य भूमिका घेत समूहगीताचे बक्षीस स्वीकारले नसते तर आज ट्रॉफी परत करण्याची वेळ आली नसती, असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
यासंबंधी सांस्कृतिक समन्वयकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. मुंबई विद्यापीठाच्या सहभागी स्पर्धकांच्या मते विद्यार्थ्यांनी तीन-चार महिने मेहनत घेतली होती. आमच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करता झालेल्या घटनेचे विश्लेषण करणे योग्य वाटत नाही.