मुंबई विद्यापीठाचा अजब तोडगा
By admin | Published: April 29, 2015 01:04 AM2015-04-29T01:04:13+5:302015-04-29T01:04:13+5:30
शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बीपीएड अभ्यासक्रम बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत.
तेजस वाघमारे ल्ल मुंबई
मुंबई विद्यापीठाचा वादग्रस्त विभाग असलेल्या शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या वादावर पडदा टाकण्यासाठी विद्यापीठाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बीपीएड अभ्यासक्रम बंद करण्यासाठी पावले उचलली आहेत. मंगळवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याविषयी चर्चा झाली असून पुढील आठवड्यात या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यामधील वाद टोकाला पोहोचले आहेत. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना कायदेशीर नोटीस पाठविण्याचा प्रकार विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी तक्रार निवारण समितीनेही शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या प्रती असणारी वागणूक आणि वर्तणूक शिक्षकी पेशाला साजेशी नसल्याचा ठपका ठेवत प्राध्यापकांवर कठोर कारवाई करण्याची शिफारस विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती. शारीरिक शिक्षण विभागातील वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर पडदा टाकण्यासाठी विद्यापीठाने थेट २0१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून बीपीएड अभ्यासक्रम एक वर्षासाठी बंद करण्याचा अजब प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावावर मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शारीरिक शिक्षण विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यातील वाद शिगेला पोहोचत असल्याने बीपीएड अभ्यासक्रम एक वर्ष बंद करण्याच्या निर्णयाला परिषदेत बहुतांश सदस्यांनी समर्थन दर्शविले आहे. दरम्यान, बीपीएड अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेत घेतला असल्याचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी सांगितले. तर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या माहितीचे खंडन केले आहे. व्यवस्थापन परिषदेत बीपीएड अभ्यासक्रम एक वर्षासाठी बंद करण्याबाबत चर्चा झाली. परंतु याबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए. खान यांनी सांगितले.