मुंबई विद्यापीठाची कामे मार्गी लागणार
By admin | Published: April 21, 2016 04:52 AM2016-04-21T04:52:00+5:302016-04-21T04:52:00+5:30
गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांची दखल घेत, मुंबई विद्यापीठाने अधिष्ठाता पार्श्वभूमीवर शाखानिहाय पाच समन्वयकांची निवड केली आहे.
मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांची दखल घेत, मुंबई विद्यापीठाने अधिष्ठाता पार्श्वभूमीवर शाखानिहाय पाच समन्वयकांची निवड केली आहे. त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी सिनेट बरखास्त झाल्यानंतर विद्यापीठातील शाखांना वालीच उरला नव्हता.
विद्यापीठातील मागील सिनेट सदस्यांबरोबरच कला, विज्ञान, वाणिज्य, विधी आणि व्यवस्थापन शाखांच्या अधिष्ठातांची मुदत संपली होती. शिवाय, राज्य सरकारतर्फे नवीन विद्यापीठ कायदा येणार असल्यामुळे विद्यापीठातील शाखांना वालीच उरला नव्हता. त्यामुळे अधिष्ठातांशिवाय काम सुरू होते. परिणामी, अभ्यासक्रमातील बदल, परीक्षाबांबतचे महत्त्वाचे निर्णय रखडले होते. याचा त्रास मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कोकण विभागातील विद्यार्थ्यांना होत होता. हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठाने पाचही शाखांसाठी स्वतंत्र्य समन्वयकांची नियुक्ती केली आहे.कला शाखेसाठी प्रा. डॉ. एम. एस. कुऱ्हाडे, विज्ञान शाखेसाठी डॉ. विजय जोशी, वाणिज्य शाखेसाठी डॉ. एस. एस. गर्दे, व्यवस्थापन शाखेसाठी डॉ. उदय साळुंखे आणि फाइन आर्टसाठी प्रा. राजीव मिश्रा यांची नियुक्ती मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे. ही नियुक्ती तात्पुरती असेल, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.