मुंबई दर मिनिटाला ३३६ लोकांना लस देते; २६ लाख शहरवासीयांचे पूर्णपणे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:06 AM2021-09-03T04:06:47+5:302021-09-03T04:06:47+5:30
मुंबई : सरकारने आठवड्याच्या सुरुवातीच्या एकाच दिवसात मुंबई शहरातील १.६१ लाख लोकांचे लसीकरण केले आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईकरांना आतापर्यंत ...
मुंबई : सरकारने आठवड्याच्या सुरुवातीच्या एकाच दिवसात मुंबई शहरातील १.६१ लाख लोकांचे लसीकरण केले आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईकरांना आतापर्यंत ९७ लाख इतके लसींचे डोस पुरवले गेले. हे डोस नागरी संस्था चालवणारे केंद्र आणि खासगी रुग्णालयांद्वारे दिले गेले आहेत. यापैकी ७१ लाख लोकांना त्यांचा पहिला डोस देण्यात आला होता. २६ लाख शहरवासीयांचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले.
गेल्या काही दिवसात कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून मुंबई महापालिका वेगाने काम करीत आहे. १८ वर्षे व अधिक वय असणाऱ्या सुमारे ७४ टक्के नागरिकांचे एक लसीकरण झालेले आहे. उर्वरित २६ टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी योग्यप्रकारे मास्क परिधान न करता नागरिक आढळून येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तसेच अनेक सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर राखले जात नसल्याच्या तक्रारीदेखील प्राप्त होत आहेत.
याबाबत योग्य ती खबरदारी न घेतल्यास पुन्हा एकदा आपल्याला निर्बंध अधिक कडक लागू शकतात. त्यामुळे नियमांच्या उल्लंघनाबाबत अधिक व्यापकतेने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मास्क न लावणाऱ्यांवर करण्यात येत असलेली दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी सर्व २४ प्रशासकीय विभागांना दिले आहेत. या अनुषंगाने आवश्यक तेवढ्या संख्येतील क्लीन-अप मार्शलची तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांद्वारे करण्यात येत असलेली विना मास्कविषयक कारवाई तीव्र करण्याच्या सूचना आयुक्तांनी मुंबई पोलीस दलास दिल्या आहेत.
-------------------
मुंबईतील लोकांचे अधिकाधिक लसीकरण हे त्यांचे संरक्षण अधिक सुनिश्चित करेल आणि अंदाज केलेल्या तिसऱ्या लाटेसाठी आमची तयारी मजबूत करेल. प्रभावी आकडेवारीची ही कामगिरी आमचे आरोग्य सेवा कर्मचारी आणि नागरी संस्था या नागरिकांना तसेच मुंबईला कोविडमुक्त बनवण्याच्या बाबतीत अतूट वचनबद्धता दर्शविते. दररोज लसीकरणाच्या या प्रमाणामुळे या सर्वांचा सामना करण्यासाठी शहर अधिक विश्वासदर्शक झाले आहे.
- आदित्य ठाकरे, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री
-------------------
मुंबई शहर हे लसीकरण मोहिमेमध्ये सुव्यवस्थित आहे. शहराला सुरक्षित आणि तिसऱ्या लाटेला चांगल्याप्रकारे सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविण्यासाठी आम्ही मुंबईच्या लोकसंख्येचे लसीकरण वेळेच्या आत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरकारी यंत्रणा, सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिकाधिक लोकांना लस मिळावी याची खात्री करून लसीविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
- डॉ. राहुल पंडित, टास्क फोर्स, राज्य कोविड १९
-------------------