Join us

मोटरमनचं प्रसंगावधान! वेळीच ब्रेक दाबला अन् वृद्ध व्यक्ती मृत्यूच्या दारातून परतला; पाहा थरारक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 4:10 PM

मोटरमननं समयसूचकता दाखवत आपत्कालीन ब्रेक दाबला आणि वृद्ध व्यक्ती रेल्वेच्या चाका खाली येण्यापासून बचावला.

रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करा असं वारंवार सांगण्यात येतं. तरीही अनेक जण स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे ब्रिजचा वापर न करता रेल्वे रुळांवरुनच एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातात. यात अनेकांनी आजवर प्राणही गमावले आहेत. पण आज कल्याण स्थानकात अशीच एक थरारक घटना समोर आली आहे. (Mumbai Varanasi train applied emergency brakes immediately and saves senior citizen who was crossing tracks at Kalyan station)

मुंबई-वाराणसी रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचत असताना एक वृद्ध व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत असल्याचं मोटरमनला दिसलं. त्यानंतर मोटरमननं समयसूचकता दाखवत आपत्कालीन ब्रेक दाबला आणि वृद्ध व्यक्ती रेल्वेच्या चाका खाली येण्यापासून बचावला. अवघ्या काही सेकंदाच्या फरकानं वृद्धाचा जीव वाचला. रेल्वे वृद्ध व्यक्तीच्या अतिशय जवळ येऊन थांबली. इंजिनाच्या पहिला चाकाजवळ ही व्यक्ती अडकली होती. रेल्वेचे लोको पायलट व सहाय्यक पायलट तातडीनं खाली उतरले आणि संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलं. 

वृद्धाचं दैव बलवत्तर म्हणून रेल्वे ऐनवेळी थांबली आणि त्याचे प्राण वाचले. लोको पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यानं दाखवलेल्या समयसूचकतेचं कौतुक केलं जात आहे. यासोबतच स्वत:चा जीव धोक्यात घालून अशा पद्धतीनं रेल्वे रुळ ओलांडू नका असं आवाहन या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वेअपघातकल्याण