MNS activist killed in Mumbai: बाप हात जोडून विनवण्या आहे. रस्त्यावर पडलेल्या मुलाला रिक्षावाले आणि फेरीवाले लाथा-बुक्क्यांनी तुडवत आहे. त्याला वाचवण्यासाठी आई त्यांच्या अंगावर पडलीये. पण, रिक्षावाले आणि फेरीवाले काही थांबत नाही... असे अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तीला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी मारहाण केली, त्याचा मृत्यू झाला. आकाश माईन असे त्याचे नाव असून, तो मनसेचा कार्यकर्ता आहे. मुंबईतील मालाड पूर्व भागात रविवारी (१३ ऑक्टोबर) ही घटना घडली.
रिक्षावाले आणि फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश माईन याला रात्री ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांच्या पाय, हात, पोट आणि कंबरेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
आकाश माईन मारहाण, नेमकं काय घडलं?
२८ वर्षीय आकाश दत्तात्रय माईन हा स्कूटरवरून पत्नीसोबत कार खरेदी करण्यासाठी गेला होता. मालाड रेल्वे स्टेशनजवळ एका रिक्षाचालकाने अचानक कट मारला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता वाद वाढला.
रिक्षाचालकाने त्यांच्या इतर रिक्षाचालक मित्रांना आणि आजूबाजूच्या फेरीवाल्यांना बोलावून घेतलं. त्यानंतर आकाश माईन याला त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तिथे आकाशचे आईवडीलही आले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
बाप विनवण्या करत होता, आई मुलाला वाचवण्यासाठी धडपडत होती
रिक्षावाले आणि फेरीवाले आकाशवर तुटून पडले. आकाशचे वडील त्यांच्यासमोर हात जोडून विनवण्या करत होते. तर आई त्याच्या मारापासून वाचवण्यासाठी आकाशच्या अंगावर पडली. मात्र, मारहाण करणाऱ्यांनी आकाशच्या वडिलांनाही मारले. हा सगळा प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
पोलिसांनी आकाशची पत्नी अनुश्री माईन हिच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलीस ठाण्यात रविवारी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला. आकाश माईन याला मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेला दगड पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ९ आरोपींना अटक केली. त्यापैकी ६ जणांची ओळख पटली असून, अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दीपक आमटे, राकेश ढवळे आणि साहिल कदम अशी त्यांची नावे आहेत. अविनाश कदम याच्यावर जखमी केल्याप्रकरणी आणि एक अपघाताचा गुन्हा पंतनगर आणि बोरिवली ठाण्यात दाखल आहे.