‘ह्यूएन त्संग’ची मुंबई भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:44 AM2019-06-30T05:44:54+5:302019-06-30T05:45:20+5:30

इसवी सनाच्या सातव्या शतकात ‘ह्यूएन त्संग’ नावाचा एक चिनी बौद्ध प्रवासी भारतात येऊन गेला.

 Mumbai visit of 'Heuen Tsang'! | ‘ह्यूएन त्संग’ची मुंबई भेट!

‘ह्यूएन त्संग’ची मुंबई भेट!

Next

- डॉ. सुरज अ. पंडित


इसवी सनाच्या सातव्या शतकात ‘ह्यूएन त्संग’ नावाचा एक चिनी बौद्ध प्रवासी भारतात येऊन गेला. तो स्वत: बौद्ध भिक्षू होता. नालंदासारख्या मोठ्या विद्यापीठात राहून त्याने ज्ञानार्जन केले. भगवान बुद्धांची जन्मभूमी भारत व भारतातील बौद्धधर्म समजून घेण्यासाठी अनेक बौद्ध मठांना त्याने भेटी दिल्या. या त्याच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन त्याने लिहून ठेवले आहे. जगभरातील अनेक भाषांत त्याची भाषांतरे झाली आहेत. त्या आधारे सातव्या शतकातील भारताच्या सांस्कृतिक जीवनाची आपल्याला ओळख पटते.

‘ह्यूएन त्संग’ नालंदाहून भारताच्या पूर्व किनाऱ्याने दक्षिणेत तामिळनाडूपर्यंत आला व तिथून पुढे त्याने पश्चिमेकडे कुंतल देशात प्रवेश केला. तो पुलकेशी दुसरा या चालुक्य राजाविषयी माहिती देऊन पुढे महाराष्ट्र देशात आल्याचे सांगतो. त्याचा यापुढील प्रवास कोकणातून गुजरातमधील वलभीच्या दिशेने झाला. याच दरम्यान ‘ह्यूएन त्संग’ मुंबईच्या परिसरात येऊन गेला. महाराष्ट्रातील माणसांविषयी तो अतिशय आपुलकीने बोलतो. येथील माणसे साधी, सरळ पण स्वाभिमानी आहेत असे त्याचे मत आहे. मुंबई परिसरातून जाताना तो येथील बौद्ध स्थळांना भेट देतो आणि महायान बौद्धांबरोबरच थेरवाद बौद्धमताचे अनुयायी येथे मोठ्या प्रमाणात राहत होते असे नमूद करतो.
मुंबईच्या परिसरातील सम्राट अशोकाने बांधलेल्या एका मोठ्या बौद्ध स्तूपाविषयी तो सांगतो. हा स्तूप म्हणजेच सोपाºयाचा बौद्ध स्तूप. याच्या दक्षिणेला एका डोंगरात एक बौद्ध भिक्षूसंघ आहे. या भिक्षूसंघाचे तो वर्णन करतो. हे वर्णन कान्हेरीच्या बौद्ध भिक्षू संघाशी तंतोतंत जुळते. येथील विहार डोंगराच्या उतारावर तीन स्तरांमध्ये कोरलेले असून अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याच्या प्रवेशद्वारावरच दगडात कोरलेल्या एका हत्तीचे शिल्प आहे. कान्हेरी येथे एका हत्तीचे शिल्प प्रवेशद्वारानजीकच सापडले होते. येथील मुख्य चैत्यगृहामध्ये एका विशाल स्तूपासमोर तितकीच भव्य बुद्ध मूर्ती बसवली आहे, असे तो सांगतो. कान्हेरीच्या लेणी क्रमांक ३ मध्ये मुख्य स्तूपाच्या समोर बुद्धाची भव्य मूर्ती बसवण्यासाठी जमिनीत कोरलेल्या खोबणी आजही पाहायला मिळतात. ‘ह्यूएन त्संग’च्या मते हा भिक्षूसंघ अतिशय महत्त्वाचा असून दिन्नागासारखे मोठे तत्वज्ञ येथे राहून गेले होते. सातव्या शतकात प्रचलित असलेल्या अनेक दंतकथा नोंदवत असताना तो आपण पूर्वी पाहिलेली कान्हेरीच्या जन्माविषयी ‘आचार्य अचला’ची कथाही नोंदवतो.
‘ह्यूएन त्संग’ने भारतातील विविध बौद्ध मठांमधून अनेक महायानग्रंथांची हस्तलिखिते संकलित केली. कृष्णगिरी महाविहरातूनही त्याने काही बौद्धग्रंथांची हस्तलिखिते चीनला नेली. या बौद्ध संस्कृत ग्रंथांची पुढे त्याने चिनी भाषेत भाषांतरे केली. त्याची जंत्री आज आपणास उपलब्ध आहे. यापैकीच एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘एकादशमुखअवलोकितेश्वरधारणी’. हा ग्रंथ साधारण इसवीसनाच्या पाचव्या शतकात लिहिला गेला. त्याची अनेक भाषांतरेही झाली. यापैकी चिनी भाषेत झालेले तिसरे भाषांतर ‘ह्यूएन त्संग’ने केले.
‘ह्यूएन त्संग’ कान्हेरीच्या भिक्षूसंघात काही काळ राहिला होता. येथून त्याने मोठे ज्ञानभांडार बरोबर नेले. येथील आचार्य परंपरेविषयी तो मोठ्या आदराने बोलतो. याच कान्हेरीच्या भिक्षू संघातून परत जाताना त्याने बोधिसत्त्व अवलोकितेश्वराची एक विशिष्ट मूर्ती लाकडामध्ये कोरून स्वत:बरोबर नेली होती. यामुळेच एका संप्रदायाचा चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला व संपूर्ण पूर्व आशिया बोधिसत्त्वाच्या या स्वरूपामुळे प्रभावित झाली. याविषयी आपण पुढील लेखात विस्ताराने चर्चा करणारच आहोत.


(लेखक साठ्ये महाविद्यालयात प्राचीन भारतीय संस्कृती आणि पुरातत्त्व विभागाचे विभागप्रमुख आहेत.)

Web Title:  Mumbai visit of 'Heuen Tsang'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई