Join us

मुंबईला अतिवृष्टीचा इशारा; पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हवामान खात्याने ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हवामान खात्याने ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. परिणामी, या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणा, सर्व जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. मुंबई महापालिकाही सज्ज झाली असून, पाणी साचू शकेल, अशा ठिकाणी ४७४ पंप बसवण्यात आले असून याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंता घटनास्थळावर राहून पाणी निचऱ्याचे काम करणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशात जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन झाडे पडणे, पाणी साचणे, मॅनहोल उघडे राहणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. धोकादायक इमारतीमधील नागरिकांसाठी संक्रमण शिबिरे तयार आहेत. अनेक विकासकामे सुरू आहेत, कामाचे डेब्रीज रस्त्यावर आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी, विकास कामांच्या ठिकाणी पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घेतली जात आहे. शिवाय पालिका क्षेत्रातील प्रत्येक पोलीस ठाण्याला निधी देऊन स्कॉड तयार केला आहे. वॉर्डमध्ये झाडे पडल्यास, हायटाइडमुळे अडचणी निर्माण झाल्यास त्याच्या निवारणाचे काम स्कॉड करेल. प्रत्येक वाॅर्डात मनपाच्या ५ शाळा तयार असून गरजेनुसार लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल. एनजीओच्या मदतीने स्थलांतरित लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येईल.

* हिंदमाता परिसरात दोन टँक

पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसवले आहेत. याद्वारे साचलेल्या पाण्याचा निचरा केला जाईल. अतिवृष्टीत पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंते घटनास्थळावर उपस्थित राहून पाणी निचऱ्याचे काम करतील. हिंदमाताच्या परिसरात दोन टँक तयार केले आहेत. यामध्ये साचलेले पाणी वळते करून साठवण्याची व्यवस्था आहे.

- इक्बाल सिंह चहल,

आयुक्त, मुंबई महापालिका

-------------------------------------