मुंबईला पावसाने पुन्हा झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:05 AM2021-07-17T04:05:59+5:302021-07-17T04:05:59+5:30
मुंबई : गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी पहाटेपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना पुन्हा झोडपले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या ...
मुंबई : गुरुवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारी पहाटेपर्यंत कोसळलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना पुन्हा झोडपले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई शहरासह उपनगरात बहुतांशी वस्त्यांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचले होते. उपनगरातील बहुतांशी रस्त्यांवर पुराच्या पाण्याप्रमाणे लोंढे वाहत असल्याचे चित्र होते. शहरात ६४, पूर्व उपनगरात १२० आणि पश्चिम उपनगरात १२७ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून शुक्रवारी सकाळी दहानंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. दरम्यान, भल्या पहाटेच कोसळलेल्या पावसामुळे मुंबईची रेल्वे आणि रस्ते वाहतूक बऱ्यापैकी कोलमडल्याने मुंबई स्लो ट्रॅकवर आली होती.
गुरूवारी मध्यरात्री बारा नंतर मात्र मुंबईतल्या बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली. पहाटे तीननंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने रौद्र स्वरूप धारण केले. सकाळी दहा वाजेपर्यंत ठिकाणी कोसळत असलेल्या पावसाने मुंबईला जणूकाही धडकी भरवली. पश्चिम उपनगरात मालाड येथील काही झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. कुर्ला पश्चिमेकडे बैल बाजार येथे वाहणाऱ्या मिठी नदी लगतच्या क्रांतीनगर या वस्तीमध्ये देखील साचलेल्या पावसाच्या पाण्याने नागरिकांच्या नाकीनऊ आले. शुक्रवारच्या सकाळपर्यंत येथील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू होते. मुंबईत सखल भागात वास्तव्य करत असलेल्या बहुतांश नागरिकांच्या घरात गुडघ्याएवढे पाणी साठले होते. यातील बहुतांशी भाग हे नाल्याशेजारी आणि मिठी नदी शेजारी राहणाऱ्या वस्तीमधील आहेत. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग लगत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या घरात देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एस. व्ही. रोड आणि कुर्ला अंधेरी मार्गावरील वाहतूक पावसामुळे धीम्या गतीने धावत होती. पूर्व उपनगरात लालबहादूर शास्त्री मार्गावर नेहमीप्रमाणे कमानी, शीतल सिनेमा, शीतल सिग्नल, कल्पना सिनेमा आणि कुर्ला डेपो परिसरात पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहत होते. मुंबई शहरात नेहमीप्रमाणे माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंद माता या परिसरात पावसाच्या पाण्याचा त्रास वाहन चालक आणि नागरिकांना देखील झाला.
शुक्रवारी सकाळीच पावसाने खोडा घातल्याने कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला. सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल आजही बंद आहे. त्यामुळे या प्रवाशांचा भार बेस्ट आणि इतर वाहतुकीवर पडत आहे. सकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे मार्ग असे दोन्ही विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.