मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात शनिवारी दुपारी रंगलेल्या ऊनं पावसाच्या खेळानंतर वातावरणात अचानक बदल झाले; आणि दुपारसह सायंकाळी आणि रात्री वा-याच्या वेगाने धो धो कोसळलेल्या धारेने मुंबईकरांना अक्षरश: झोडपून काढले. तत्पूर्वी सकाळी मात्र मुंबई स्वच्छ सुर्यप्रकाशात न्हाहून निघाली होती. दरम्यान, १३ आणि १४ सप्टेंबर रोजी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. १३ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. महाराष्ट्राच्या किनारी सोसाटयाचा वारा वाहील. १४ सप्टेंबर रोजी संपुर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. १५ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भाता मुसळधार पाऊस पडेल. १६ सप्टेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल.
१३ सप्टेंबरच्या आसपास विदर्भासह लगतच्या प्रदेशात चांगला पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात या काळात मान्सून सक्रीय राहील. १४ आणि १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस होईल. कमी दाबाच्या क्षेत्रासह हवामानात होणा-या बदलामुळे परतीच्या मान्सूनचा प्रवास विलंबाने होईल, असा अंदाज वर्तविल जात आहे. १५ सप्टेंबरच्या आसपास मान्सून राजस्थानमधून आपला परतीचा प्रवास सुरु करतो. मात्र यावेळी त्यास १५ दिवसांचा विलंब होण्याची शक्यता आहे.