Join us

मुंबईवरील पाणीसंकट गहिरे; जलाशयांमध्ये फक्त ११ टक्के साठा, बाष्पीभवनामुळे पाणी पातळीत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:20 AM

वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत आहे.

मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत वेगाने घट होत आहे. १९ मे रोजी सातही धरणांत केवळ ११ टक्के म्हणजेच १ लाख ७० हजार ६०६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सात टक्के पाणीसाठा कमी आहे. मुंबईला अतिरिक्त पाणीसाठ्याची परवानगी मिळाली असून, पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत पुरेल असे नियोजन पालिकेने केले आहे. मात्र, पावसाने वेळेत हजेरी लावली नाही तर मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. गेल्या जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने मुंबईकरांना जुलै अखेरपासून १० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने मुंबईवरील पाणीकपात रद्द करण्यात आली होती. यंदाही सातही धरणांत ११. ७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केल्याने १५ जुलैपर्यंत मुंबईची तहान भागेल, इतका उपलब्ध आहे.

बाष्पीभवनाचा वेग वाढला, यंत्रणा नाही वातावरणीय बदलांमुळे मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. बाष्पीभवनाचा वाढलेला वेग हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयातील सातत्याने आणि वेगाने होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाला कारणीभूत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मात्र, हे बाष्पीभवन किती होत आहे, त्याचे प्रमाण किती आहे यासाठी कोणतीही यंत्रणा सध्या पालिकेकडे उपलब्ध नाही.

टॅग्स :मुंबईपाणीकपातपाणी टंचाई