मुंबईवरील पाणी कपातीचे मळभ तूर्तास दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:59 PM2023-06-06T12:59:22+5:302023-06-06T12:59:45+5:30
दरम्यान, पाणी कपातीबाबत पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही धरणांमध्ये ४ जूनपर्यंत फक्त ११. ५८ टक्के म्हणजेच जवळपास १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक होता. दरम्यान, मुंबईकरांची पाणी चिंता मिटवण्यासाठी भातसा, अप्पर वैतरणातून राखीव पाणीसाठा मिळण्यासाठी पालिका प्रशासनाच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून अखेर मंजुरी मिळाली आहे. दोन्ही धरणांतून एकूण १. ५ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा मुंबईसाठी वापरण्यास मंजुरी मिळाली. जुलैपर्यंत मुंबईकरांची तहान भागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, पाणी कपातीबाबत पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशीतून मुंबईला रोज ३,८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सात धरणांपैकी राज्य सरकारच्या अखत्यारित असलेली अप्पर वैतरणा आणि भातसा ही मोठी धरणे आहेत. अप्पर वैतरणात २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर पाणी साठवण क्षमता असून आता ६० हजार १८८ दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे तर भातसाची साठवण क्षमता ७ लाख १७ हजार ३७ असून सध्याच्या घडीला १ लाख ७४ हजार २६ दशलक्ष लिटर साठा आहे.