मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
By जयंत होवाळ | Published: May 25, 2024 11:30 AM2024-05-25T11:30:46+5:302024-05-25T11:31:07+5:30
Mumbai Water Shortage: जलाशयांमधील पाणीसाठा घटल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय; सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने, हा साठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरात गुरूवार दिनांक ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात, तर बुधवार दिनांक ५ जून २०२४ पासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे.
मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन देखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. २०२१ आणि २०२२ या दोन वर्षात दिनांक १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रीय होता. मात्र २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यामध्ये सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे.
२५ मे २०२४ रोजीची आकडेवारी लक्षात घेता, मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. वार्षिक १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत सध्या फक्त ९.६९ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
भातसा धरणातून १,३७,००० दशलक्ष लीटर तर अप्पर वैतरणा धरणातून ९१,१३० दशलक्ष लीटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध असून मुंबईकर नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे, यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे, ही देखील सकारात्मक बाब आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.
अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा १० टक्केपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, या सर्वाचा विचार करून, खबरदारीचा उपाय म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सदर पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही ५ टक्के आणि १० टक्के कपात लागू राहणार आहे. समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे.