मुंबईकरांच्या पाण्याचे टेन्शन वाढले; महापौरांच्या प्रभागालाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 06:18 AM2018-12-06T06:18:38+5:302018-12-06T06:18:44+5:30
मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू असताना, कुलाबा विभागात सर्वाधिक पाणीकपात करण्यात आल्याची शिवसेना नगरसेविकेची तक्रार आहे.
मुंबई : मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू असताना, कुलाबा विभागात सर्वाधिक पाणीकपात करण्यात आल्याची शिवसेना नगरसेविकेची तक्रार आहे. वारंवार तक्रार करूनही सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या विभागातील पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. मात्र, आता खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा प्रभाग पाणीटंचाईचा सामना करीत आहे. त्यामुळे ही पाणीकपात १० नव्हे, तर ३० टक्के असल्याचा संताप नगरसेवक व्यक्त करीत आहेत. मात्र, तलावांची पातळी दिवसेंदिवस आणखी कमी होत असल्याने, ऐन उन्हाळ्यात पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८५ टक्केच जलसाठा झाला. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत मुंबईकरांना पाणी पुरविण्यासाठी महापालिकेने १५ आॅक्टोबरपासून पाणीकपात लागू केली आहे. सध्या परिस्थिती भीषण नसल्याने, ही कपात केवळ १० टक्केच आहे. मात्र, आतापासूनच अनेक विभागांमध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत.
उच्चभ्रू कुलाबा विभागात आॅक्टोबर महिन्यापासून पाण्याचा ठणठणाट आहे. मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यातील पाणी गायब झाल्याने तीव्र पडसाद उमटले होते. अखेर तातडीने येथील पाणीप्रश्न सोडविण्यात आला.
मात्र, काही दिवसांपासून या विभागातील नागरिकांना पुन्हा पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रस्त्यावरून फिरणेही यामुळे मुश्कील झाले असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केली. शिवसेना नगरसेविका राजुल पटेल, मंगेश सातमकर यांनीही आपल्या विभागांमध्ये कमी पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, आता खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वांद्रे प्रभाग क्रमांक ८७ मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे या पाणीटंचाईचा जाब त्यांनी प्रमुख जलअभियंता अशोक तवाडिया यांना विचारला आहे.
>१५ आॅक्टोबरपासून कपात लागू
मुंबईत दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मात्र, तलावांमध्ये या वर्षी कमी जलसाठा असल्याने, १५ आॅक्टोबरपासून महापालिकेने सरसकट १० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
>तलावांमधील पाणीसाठ्यात घट
वर्षभर मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. मात्र, तलावांमध्ये ४ डिसेंबर रोजी नऊ लाख ९४ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता. गेल्या वर्षी याच तारखेला तलावांमध्ये १२ लाख १४ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता.
मुंबईला ५० टक्के पाणीपुरवठा करणाºया भातसा धरणातही आता केवळ चार लाख ९९ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. वैतरणा नदीची पातळीही दिवसेंदिवस कमी होत आहे.