मुंबईत बरसल्या सरींवर सरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:56 AM2018-08-05T05:56:30+5:302018-08-05T05:56:40+5:30
जुलै महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्याची सुरुवात दमदार केली आहे.
मुंबई : जुलै महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्याची सुरुवात दमदार केली आहे. पहिले तीन दिवस तुरळक ठिकाणी बरसलेल्या पावसाने ४ आॅगस्ट रोजी म्हणजे शनिवारी पश्चिम उपनगर वगळता मुंबई शहरासह पूर्व उपनगरात दमदार हजेरी लावली आहे. विशेषत: दक्षिण मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळाला. यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात १, २ आणि ३ आॅगस्ट रोजी पावसाचा नुसताच शिडकावा सुरू होता. मात्र, शनिवार, ४ आॅगस्टला पावसाने दमदार हजेरी लावली. पूर्व उपनगरात शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ऊन पडले असले तरी त्यानंतर ढग दाटून आले. विशेषत: दुपारी दीडच्या सुमारास चांगलाच काळोख झाला असतानाच वांद्रे-कुर्ला संकुलापासून कालिना, सांताक्रुझ, कुर्ला, सायन, विद्याविहार, घाटकोपर परिसरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. दुपारी दोन वाजता मुसळधार सरींनी विश्रांती घेतली. मात्र, दुपारी अडीच वाजेपर्यंत या परिसरात पावसाची रिमझिम सुरूच होती.
मुंबई शहराचा विचार करता दुपारी अडीचनंतर येथेही काळोख दाटून आला होता. नरिमन पॉइंटपासून गिरगाव, भायखळा, गिरगाव चौपाटी, महालक्ष्मी, वरळी आणि लोअर परळ परिसरात दुपारी अडीच ते चारच्या दरम्यान मुसळधार सरी कोसळल्या. ऐनवेळी दाखल झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवाय ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने मुंबईकरांच्या मनस्तापात भर पडली होती. दुपारी चारनंतर रिमझिम सुरू असतानाच अधूनमधून मुसळधार सरी कोसळत होत्या.
तीन दिवस वेग कायम
उत्तर कोकणात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात ५, ६ आणि ७ आॅगस्ट रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.