मुंबई : उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना किंचित का होईना दिलासा मिळाला आहे. कारण बुधवारच्या तुलनेत गुरुवारी रात्रीच्या किमान तापमानात घसरण झाली आहे. मुंबईत हे किमान तापमान २४.७ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे. बुधवारी हेच तापमान २७ अंशांच्या आसपास होते. दरम्यान, ८ एप्रिलला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.मुंबईत सलग कमाल तापमान ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. मार्च महिन्यात हेच कमाल तापमान ३९ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत होते. आता कमाल तापमानात घसरण झाली असली तरी वाढता उकाडा नागरिकांना घाम फोडत आहे. राज्यात उन्हाळा आणि पावसाळा असे दुहेरी हवामान असून, अवकाळी पावसामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. गेल्या २४ तासांत दक्षिण कोकण गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडला.
Mumbai Weatder: दिवसा उकाडा रात्री गारवा, ऐन उन्हाळ्यात मुंबईत रात्र गार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 7:01 AM