मुंबईची 'लाइफलाइन' पुन्हा ट्रॅकवर; तिन्ही लोकल मार्गांवर कशी आहे स्थिती? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 08:06 AM2024-07-09T08:06:45+5:302024-07-09T08:07:11+5:30
तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा सुरू असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Mumbai Local ( Marathi News ) : मुंबई शहराला पावसाने झोडपून काढल्यामुळे सोमवारी सकाळपासून चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने शहर आणि उपनगरांतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे ट्रॅकवरील पाणी दूर झाले असून तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा सुरू असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पाणी ओसरल्यानंतर हार्बर लाइनवरील ट्रॅक पहाटे साडेचार वाजल्यापासून कार्यान्वयित करण्यात आले आहेत. तसंच मध्य मार्गावरील जलद आणि धिम्या गतीच्या गाड्या वेळापत्रकापेक्षा २ ते ३ मिनिटं उशिराने धावत आहेत. तर पश्चिम मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत.
Maharashtra | The Harbour line track was operationalised at 4.30 am after the water receded. Main Line both fast and slow locals are running 2-3 min behind schedule and harbour line locals are running almost on time now: Central Railway, CPRO
— ANI (@ANI) July 9, 2024
दरम्यान, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा सुरळीत झाल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असं असलं तरी आजही हवामान खात्याने मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवल्याने नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पावसाचा इशारा, आपत्कालीन स्थितीत 'या' नंबरवर साधा संपर्क
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकभूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, अति मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सूचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.