Mumbai Weather Forecast: राजधानी मुंबईला पाऊस झोडपणार; मुसळधार पावसाचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:22 AM2024-07-15T11:22:36+5:302024-07-15T11:23:33+5:30
हवामान खात्याकडून आज पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Mumbai Rain News ( Marathi News ) : मुंबई शहर आणि उपनगरांवर मागील काही दिवसांपासून वरुणराजाची कृपा पाहायला मिळत आहे. शहर परिसरात कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच उद्या १६ जुलैसाठी हवामान खात्याकडून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनच्या सुरुवातीला मुंबईला पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरात मध्यम ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
समुद्रात भरती-ओहोटी कधी?
ओहोटी: दुपारी - १२:१५ वाजता - २.५१ मीटर
भरती: सायंकाळी - ०५:५७ वाजता - ३.३४ मीटर
ओहोटी - (उद्या - दि.१६.०७.२०२४) - मध्यरात्री - १२:५६ वाजता - १.५० मीटर
🗓️ १५ जुलै २०२४
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 15, 2024
⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल;तर काही ठिकाणी अती जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
ओहोटी - दुपारी - १२:१५ वाजता - २.५१ मीटर
🌊 भरती - सायंकाळी -०५:५७ वाजता - ३.३४ मीटर
ओहोटी - (उद्या - दि.१६.०७.२०२४) -…
पाणीसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ४ जुलै रोजी ८.५९ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४ जुलै रोजी पाणीसाठा २९.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्या १० दिवसांत मुंबईच्या पाणीसाठ्यात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या वर्षी १४ जुलै रोजी इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. तर १४ जुलै २०२२ रोजी पाणीसाठा तब्बल ६५ टक्के इतका होता. दरम्यान, पाणीसाठ्यातील वाढ दिलासा देणारी असली तरी तूर्तास पालिका प्रशासनाकडून पाणी कपात मागे घेतली जाणार नसल्याने मुंबईकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.