Mumbai Weather Update: राज्यात ६ जून रोजी मान्सून (Monsoon) दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. बुधवारी सकाळी मान्सून-पूर्व सरींनी आर्थिक राजधानी मुंबईला उष्णतेपासून थोडा दिलासा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भाग उष्णतेने होरपळत आहेत. मान्सून आगमनाच्या अंदाजामुळे येत्या काही दिवसांत काही प्रदेशांमधील उच्च तापमान आणि उष्णतेची लाट कमी होईल. ६ जून रोजी आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून मुंबई, कर्नाटकचा उर्वरित भाग, किनारी आंध्र प्रदेश आणि छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागांमध्ये ९ किंवा १० जूनपर्यंत दाखल होईल.
आतापर्यंत मान्सूनची प्रगती जवळपास सामान्य असल्याचं हवामान संस्थेनं नमूद केलं आहे. असं असलं तरी अद्याप काही भागात अजिबातच पावसाची चाहूल लागलेली नाही. मान्सून साधारणपणे १० जून किंवा ११ जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं काय?हवामान खात्यातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार, "मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात नैऋत्य मोसमी वारे आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. कर्नाटकचा उर्वरित भाग आणि किनारी आंध्र प्रदेश, मुंबईसह महाराष्ट्राचा काही भाग, तेलंगणाचा काही भागात, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील ३ ते ४ दिवसांत पावसाचे आगमन होईल"
आयएमडी मुंबईच्या हवामानशास्त्र महासंचालकांनी सांगितले की, "मान्सून ६ जून रोजी तळ कोकणात दाखल झाला आहे. सकाळपर्यंत तो रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पुढील ४ दिवस अनुकूल आहेत. मान्सून ९ ते १० जूनच्या सुमारास मुंबईत येण्याची अपेक्षा आहे"
"पुढील आठवड्यात मान्सून आणखी उत्तरेकडे प्रगती करत त्यानं अर्धा देश व्यापला असेल. मान्सूनने व्यापलेल्या भागात यापुढे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता नाही. जूनमधील पावसाचे प्रमाण आतापर्यंत सामान्य आहे", असं आयएमडीचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितले.
'स्कायमेट वेदर'चे हवामानशास्त्राचे उपाध्यक्ष महेश पलावत म्हणाले, "मान्सूनची प्रगती आतापर्यंत सामान्य झाली आहे. अद्याप भारतामध्ये पाऊस कमी झाला आहे. पण येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून पुणे, मुंबई इत्यादी ठिकाणी दाखल होईल". हवामान संस्थेने शुक्रवारपर्यंत उत्तर-पश्चिम भारतात पाऊस आणि वादळाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच पुढील पाच दिवसांत पूर्व भारत, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातील काही भागात उष्णतेच्या लाटेच्या स्थितीचा अंदाज आहे.