मान्सूनमुळे गारद झालेली मुंबई पूर्वपदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:15+5:302021-06-11T04:06:15+5:30
पाऊस काहीसा आळसावला; मात्र, अद्याप धोका टळलेला नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत बुधवारी दाखल झालेल्या मान्सूनने गुरुवारीही ...
पाऊस काहीसा आळसावला; मात्र, अद्याप धोका टळलेला नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत बुधवारी दाखल झालेल्या मान्सूनने गुरुवारीही आपला मारा कायम ठेवला. बुधवारच्या तुलनेत कोसळधारेचे प्रमाण कमी हाेते. शहराच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सायंकाळी तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना धडकी भरली होती. मात्र नंतर पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, मान्सूनच्या पहिल्याच दिवशी विस्कळीत झालेली मुंबई गुरुवारी पूर्वपदावर आली.
मान्सूनने बुधवारनंतर गुरुवारी सकाळच्या सुमारास काहीशी उसंत घेतली. मात्र दुपारी त्याचा जोर वाढल्याचे चित्र होते. विशेषत: शहराच्या तुलनेत मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाचा जाेर होता. तत्पूर्वी मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता. परिणामी, गुरुवारीही मुंबईत बुधवारप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळेल, अशी भीती मुंबईकरांना वाटत होती. प्रत्यक्षात मात्र अलर्टच्या तुलनेत पावसाने आपला जोर कमीच ठेवला.
मुंबईवर गुरुवारी सकाळीच पावसाचे ढग दाटून आले होते. सोबत गार आणि जोरदार वारे वाहत होते. अशा काहीशा क्लायमॅक्समुळे आता मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली जाते की काय? अशी शक्यता निर्माण झाली हाेती. प्रत्यक्षात मात्र सकाळी ११ वाजता किंचित हजेरी लावलेल्या पावसाने दुपारी २ वाजेपर्यंत आराम केला. त्यानंतर मात्र जोर पकडलेल्या पावसाने सायंकाळी ५ नंतरही आपला मारा कायम ठेवला. जोरदार कोसळत असलेल्या सरींमुळे पुन्हा एकदा धडकी भरण्यासारखे वातावरण तयार झाले हाेते. मात्र पावसाचा जोर अधूनमधून कमी होत असल्याने सखल भागात पाणी साचण्याचे प्रमाण कमी होते.
* २४ तासांतील पाऊस
शहर - १३३.५२
पूर्व उपनगर - २००.१८
पश्चिम उपनगर - १९१.४७
१० ठिकाणी बांधकामाचा भाग पडला
२७ ठिकाणी शॉर्टसर्किट
.......................