Mumbai: बेकायदा बांधकामांना कुणाचे पाठबळ? मुलुंडमध्ये एक इमारत केली जमीनदोस्त... तरी दुसरी उभी राहिली थाटात
By मनीषा म्हात्रे | Published: April 17, 2023 01:48 PM2023-04-17T13:48:25+5:302023-04-17T13:48:46+5:30
Mumbai: सत्ताधारी आमदार आणि खासदार असलेल्या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या मुलुंडमध्ये राजकीय वरदहस्ताखाली बेकायदा बांधकाम करून इमारतीचे मजले उभारले जात आहेत.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : सत्ताधारी आमदार आणि खासदार असलेल्या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या मुलुंडमध्ये राजकीय वरदहस्ताखाली बेकायदा बांधकाम करून इमारतीचे मजले उभारले जात आहेत. नुकतीच मुलुंड पूर्वकडील अवघ्या काही दिवसांत उभ्या राहिलेल्या चार मजली इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. सोबतच याचा ठपका ठेवून विभाग सहआयुक्तांसह अभियंत्यांची उचलबांगडी करण्यात आली. एका बेकायदा बांधकामावर कारवाई केली असतानाच मुलुंड कॉलनीत अवघ्या पाच महिन्यांत तीन मजली इमारत उभी राहिली. धक्कादायक बाब म्हणजे, बांधकाम सुरू असतानाच प्रशासनाने ती बेकायदा असल्याचे सांगितले होते. मात्र, बांधकाम मालकाने कोर्ट प्रकरणाची खेळी करून तीन मजले उभे केले आहेत. रहिवासी जागेचा व्यावसायिकरीत्या वापरही सुरू केला आहे. कसलाही ठोस बांधकामाचा आधार न घेता लोखंडी अँगलल्सवर उभी केलेली इमारत कोसळण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मुलुंड कॉलनी येथील जी. जी. एस मार्ग येथील जय भारत हायस्कूलजवळ ही तीन मजली इमारत बांधण्यात आली आहे. या परिसराची पूर्वी मिलिटरी कॉलनी म्हणून ओळख होती. कालांतराने येथील घरे सिंधी कुटुंबीयांनी घेतली. आजही पाच ते सहा कुटुंबे येथे राहतात. त्यांना येण्या- जाण्यासाठी गार्डन जवळ साडेसहा ते आठ फुटी रस्ता होता. मात्र, येथील गार्डनच्या संरक्षण भिंतीला खेटूनच हे बांधकाम उभे राहिले. त्यामुळे वाटही गायब झाल्याने स्थानिकांना गार्डनमधून ये-जा करण्याची वेळ ओढवली.
पालिका तसेच काही राजकीय मंडळींना हाताशी धरून हे बांधकाम उभे राहिल्याचीही कुजबुज आहे. या बेकायदा इमारतीला वीज व पाणी पुरवठाही सुरू झाला आहे. तसेच, एका स्थानिक गुंडाच्या मदतीने बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे प्रशासन पुन्हा तारीख पे तारीखचे कारण देत आहे.
गोलमाल है भाई सब गोलमाल है...
पालिकेकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये वेगवेगळे प्लॉट क्रमांक टाकण्यात आले आहे.
पालिकेकडून १८ जुलै २०२२ ला पहिली नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर, दोन स्पिकिंग ऑर्डर पाठविण्यात आल्या.
१८ ऑक्टोबर २०२२ ला शेवटची नोटीस पाठविण्यात आली. त्यामध्ये बांधकाम बेकायदा असून ते तोडा, अन्यथा आम्ही सात दिवसांत तोडू असे नमूद करण्यात आले होते.
बांधकाम मालक नोटीसमधील ब्लॉक क्रमांक चुकीचा ठरवत आम्हाला नोटीस मिळाली नसल्याचे सांगत न्यायालयात धावधाव करत आहे.
त्यामुळे हे नेमके नजर चुकीने झाले की संगनमताने? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रशासन फक्त आश्वासन देते
गार्डन विभागानेही येथून ये-जा करण्यास मनाई केली. त्यामुळे आम्ही जायचे कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात, पावसाचे पाणी घरात येणार ही भीती आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन फक्त कारवाईचे आश्वासन देते. त्यामुळेच या बांधकामांना पाठबळ मिळत आहे.
- बलबिंदर कौर, स्थानिक
लवकरच कारवाई...
बांधकाम उभे राहत असताना ते बेकायदा असल्याबाबत वेळोवेळी नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र, वेळोवेळी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवल्यामुळे त्यावर कारवाई करता आली नाही. मात्र न्यायालयानेही त्यांचे प्रकरण फेटाळले. त्यानुसार, कारवाई करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
- गजानन धोत्रे, सहायक अभियंता, इमारत व बांधकाम विभाग, टी वाॅर्ड, मुलुंड
म्हणून सहआयुक्तांची बदली ...
मुलुंड पूर्वेकडील टाटा कॉलनी येथे अवघ्या काही दिवसांतच चार मजली बेकायदा इमारत उभी राहिली. विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही कारवाई झाली होती.
अखेर ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहोचताच या इमारतीवर कारवाई करण्यात आली. याचा ठपका ठेवत त्यांची उचलबांगडी करण्यात आली.
आम्ही उच्च न्यायालयात जाऊ
रस्त्याचा मुद्दा चुकीचा आहे. त्या भागात रस्ता नव्हताच. पालिका नोटीस आणि बांधकामाबाबत आम्ही वरच्या न्यायालयात धाव घेणार आहोत.
- सुनील मौर्या, जागेचे मालक