Mumbai: मुलाला हिसकावण्यासाठी पत्नीवर कोयत्याने हल्ला, कांदिवलीच्या समतानगर परिसरातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 12:05 PM2023-04-18T12:05:49+5:302023-04-18T12:06:06+5:30
Crime News: मुलाला हिसकविण्यासाठी पत्नीच्या हातावर कोयत्याने हल्ला करत मध्ये पडलेल्या मेहुण्यालाही जखमी करण्याचा प्रकार कांदिवलीच्या समतानगर परिसरात घडला.
मुंबई : मुलाला हिसकविण्यासाठी पत्नीच्या हातावर कोयत्याने हल्ला करत मध्ये पडलेल्या मेहुण्यालाही जखमी करण्याचा प्रकार कांदिवलीच्या समतानगर परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी शिवम सिंग (३१) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार प्रियांका (३२) कांदिवली पूर्वेतील हनुमान नगरमध्ये भाडेतत्त्वावर असलेल्या माहेरच्या घरात राहतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार सिंग याच्यासोबत २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाले. काही दिवसांनंतर सिंग याला दारू आणि गांजा पिण्याचे व्यसन असून तो कोणताही कामधंदा करत नाही हे समजले. नालासोपाऱ्याला प्रियांका सिंगसोबत राहत होती. २०१६ मध्ये त्यांना वेद नावाचा मुलगा झाला त्यानंतर पतीसोबत राहायला काही दिवस त्या उत्तर प्रदेशला गेल्या. तिथे सिंग याला दारू पिण्यावरून प्रियांका ओरडल्याने त्याने तिचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ती मुलाला घेऊन मुंबईला निघून आली.
गेली सहा वर्षे त्यांच्यात काहीही संपर्क नाही मात्र १६ एप्रिलला रात्री अडीचच्या सुमारास ती घरी असताना सिंगने दरवाजावर लाथ मारून तो तोडला आणि आत प्रवेश करत ‘वेद कहा है मुझे मेरा बच्चा दो’ असे म्हणू लागला. प्रियांका यांनी विरोध केल्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर कमरेला अडकवलेल्या कोयत्याने त्याने प्रियांकावर हल्ला केला. जो अडवत असताना प्रियांकाच्या दोन्ही हाताना गंभीर दुखापत झाली. तिला भाऊ विनय सिंग (२७) हा वाचवायला आला तेव्हा हातातील कोयता आरोपीने उलटा करून त्याला मारला तसेच प्रियांकाची आई उषा आणि बहीण रितिका यांनाही सिंगने मारहाण केली. जखमी प्रियांका यांना उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी सिंग विरोधात गुन्हा दाखल केला आहे.