अक्षय चोरगे / मुंबईदिल्ली येथे झालेले वायुप्रदूषण लक्षात घेता आता मुंबईकरांनी वेळीच सजग होणे गरजेचे असून, प्रदूषण होऊ नये म्हणून वेळीच पावले उचलली पाहिजेत. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईची अवस्था लवकरच दिल्लीसारखी होईल, अशी भीती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी व्यक्त केली.वी सिटीजन अॅक्शन नेटवर्क या संस्थेच्या वतीने ‘ब्रेथ लाइफ’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ स्वाधीन क्षत्रिय यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी टेरीचे महाव्यवस्थापक अजय माथुर, अतिरिक्त मुख्य सचिव मालिनी शंकर, वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, डॉ. सुजीत राजन आदी मान्यवर उपस्थित होते.स्वाधीन क्षत्रिय म्हणाले, आपणाला जमेल तसे प्रदूषणावर नियंत्रण राखण्यासाठी काम केले पाहिजे. कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. सायंटिफिक वेस्टवर नियंत्रण राखणे गरजेचे असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.अजय माथुर म्हणाले, मच्छरांना आळा घालण्यासाठी घरोघरी ‘मच्छर अगरबत्ती’ जाळली जाते. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषणात भर पडत असून, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अशी एक अगरबत्ती जाळणे म्हणजे पन्नास सिगारेट ओढण्यासारखे आहे. परिणामी, याला आळा घालण्याची गरज आहे. तर दिवाळीदरम्यान होणाऱ्या प्रदूषणात आता घट होत असून, ही चांगली बाब आहे. प्रदूषण रोखण्यास झाडे हातभार लावत असून, वृक्षारोपणावर मुंबईकरांनी भर दिला पाहिजे.मिलिंद भारांबे म्हणाले की, मुंबईत सुमारे दोन हजार पोलीस दररोज आॅनड्युटी असतात. प्रदूषणाचा त्रास सर्वाधिक वाहतूक पोलिसांना होतो. परिणामी, त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून, याबाबत योग्य पाऊल उचलले पाहिजे.डॉ. सुजीत राजन म्हणाले, दरवर्षी सुमारे १४ लाख लोकांना प्रदूषणामुळे जीव गमवावा लागतो. तर प्रदूषणामुळे प्रत्येक भारतीय आपल्या आयुष्यातील सरासरी तीन वर्षे गमावत आहे. परिणामी, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने सार्वजनिक वाहतूक प्रणालीवर भर दिला पाहिजे.
...तर मुंबईची दिल्ली होईल!
By admin | Published: November 14, 2016 4:44 AM