Join us  

मुंबई २ वर्षांत खड्डेमुक्त होणार, एकनाथ शिंदेंनी घेतला रस्ते कामांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 10:19 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला रस्त्यांच्या कामांचा आढावा

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पडलेल्या खड्ड्यांनी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून, यामुळे महापालिकेवर सातत्याने टीका होऊ लागली असतानाच आता येत्या दोन वर्षांत मुंबईला खड्डेमुक्त करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. चांगल्या दर्जाचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी शनिवारी मुंबई महापालिकेला केल्या आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी आढावा बैठकीत रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत सादरीकरण केले. त्यानुसार, मुंबईत टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते बांधले जात आहेत. आतापर्यंत सुमारे ९८९.८४ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्ते सुधारण्याच्या दृष्टीने सिमेंट काँक्रिटीकरणाला गती देण्यात आली आहे. २०२२-२०२३ मध्ये २३६.५८ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होत आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. तर आणखी ४०० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. उर्वरित ४२३.५१ किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण पुढच्याच वर्षी हाती घेतले जाईल.

४,९०० कोटींचा खर्च अपेक्षित ४०० किमी अंतराच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरणाची प्रस्तावित कामे शहर विभागात ५० किमी अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ८०० कोटी पूर्व उपनगरांत ७५ किमी अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ६०० कोटी प. उपनगरांत २७५ किमी अंतराच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी ३ हजार ५०० कोटी

 पूरस्थिती उद्भवणार नाहीरस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठरावीक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे तयार केले जाणार आहेत. जेणेकरून पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या नवीन निविदांमध्ये तशा अटींचा समावेश करण्यात आला आहे.- डॉ. इकबालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका  

रस्त्यांवर थेट नजररस्त्यांवर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये आणि प्रमुख अभियंता, उपप्रमुख अभियंता यांच्या कार्यालयाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला या रस्त्यांवर थेट नजर ठेवता येईल. 

टॅग्स :एकनाथ शिंदेमुंबई