येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 02:21 PM2022-11-05T14:21:51+5:302022-11-05T14:22:41+5:30

नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असून शहरात मेट्रोचे जाळे टाकण्यात येत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Mumbai will be pothole-free in the next 2 years; Announcement of CM Eknath Shinde | येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

येत्या २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Next

मुंबई - मुंबईत दर्जेदार रस्ते बांधले जात आहेत. निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २ वर्षांत ५५०० कोटी रुपयांचे काँक्रिटचे रस्ते बांधण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. येत्या दोन वर्षांत मुंबईचा बदललेला चेहरा पाहायला मिळणार आहे. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

सांताक्रुझ येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईच्या विकासाला आणखी गती देणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (एमटीएचएल) काम सुरू आहे. २२ किमी लांबीचा हा देशातील सर्वात लांब सी-लिंक आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत असून शहरात मेट्रोचे जाळे टाकण्यात येत आहे. प्रमुख शहरांमध्ये सुमारे ३४० किमी मेट्रोचे बांधकाम सुरू असून हे काम २०२७ पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

समृद्धी महामार्ग लवकरच खुला होणार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग लवकरच सुरू होणार आहे. हा एक गेम चेंजर प्रकल्प असणार आहे. महामार्गालगत अनेक नवीन योजना सुरू केल्या जात असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहेत. शिर्डीपर्यंत महामार्ग सुरू करण्याचा आमचा विचार आहे. समृद्धी महामार्ग पुढील वर्षी पूर्णपणे कार्यान्वित होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे ठाणे, रायगड, संभाजीनगर येथे उद्योग आहेत. आता महामार्गालगत उद्योगधंदेही वाढू लागले आहेत. या महामार्गामुळे शेतकरी आणि सर्व स्तरातील लोकांच्या जीवनात समृद्धी येईल. राज्यात पहिला मेट्रो आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधण्यात आला. आता मुंबई-पुणे मिसिंग लिंक बनवत आहे. या मिसिंग लिंकमुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ २० मिनिटांनी कमी होणार आहे असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

महाराष्ट्राला मिळणार मोठे प्रकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देश आणि महाराष्ट्र विकासाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचेल. राज्यात गुंतवणूक वाढावी यासाठी पंतप्रधान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राज्यातील औद्योगिक प्रकल्पांबाबत पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ, काळजी करू नका, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. दरम्यान, अनेक बड्या कंपन्यांशी केवळ सामंजस्य करारच होणार नाहीत, तर त्यांची अंमलबजावणीही केली जाणार आहे. राज्याचे औद्योगिक धोरण बदलले आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकही वाढणार आहे. आमचे सरकार हे 'लोकाभिमुख आणि विकासाभिमुख' सरकार आहे. गेल्या तीन महिन्यांत जनतेच्या हिताचे चांगले निर्णय घेतले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करून जनतेला दिलासा मिळाला आहे. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषांपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. देशात इन्फ्रा क्षेत्रात सर्वाधिक काम महाराष्ट्रात सुरू आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Mumbai will be pothole-free in the next 2 years; Announcement of CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.