मुंबईत मान्सूनपूर्व सरीही जूनमध्येच बरसणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 06:19 AM2019-05-28T06:19:50+5:302019-05-28T06:20:00+5:30
मार्च महिन्यापासून ऊन आणि उकाड्याने बेजार झालेले मुंबईकर मान्सूनपूर्व सरींच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई : मार्च महिन्यापासून ऊन आणि उकाड्याने बेजार झालेले मुंबईकर मान्सूनपूर्व सरींच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी मुंबईत मे महिन्याच्या उत्तरार्धात मान्सूनपूर्व सरींचा शिडकावा होऊन हवेत काहीसा गारवा निर्माण होतो. त्यामुळे प्रत्यक्ष पाऊस सुरू होईपर्यंत उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत असतो. मात्र, यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने मुंबईकरांना मान्सूनपूर्व सरींचीही प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
एप्रिल महिन्यात अवघी काही मिनिटे पडलेला पाऊस वगळता हा पूर्ण ऋतू कोरडा जात असून, हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही मुंबई आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार होणार नाही. मान्सूनपूर्व सरींसाठी मुंबईकरांना जूनच्या पहिल्या आठवड्याची वाट पाहावी लागणार आहे.
मे महिन्याच्या शेवटी शहर आणि उपनगरातील तापमानाचा विचार करता दिवसा कमाल तापमान ३५ तर रात्री किमान तापमान २६ राहील. तापमान कमी नोंदविण्यात येणार असले, तरी आर्द्रता अधिक असल्याने मुंबईकरांचा आणखी घाम निघणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईवर उत्तर-पश्चिमेकडून वारे वाहत असल्याने पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात हवामानात बदल अपेक्षित असून, हवेची दिशा बदलेल. परिणामी, या काळात मुंबई आणि परिसरात मान्सूनपूर्व सरी कोसळतील. या वेळी मुंबई, ठाणे, कल्याणसह अन्य ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. परिणामी तापमानात किंचित घट होईल. तरीही आर्द्रतेमधील वाढ कायम राहणार असल्याने मुंबईकरांना ‘ताप’दायक वातावरणाला सामोरे जावे लागणार आहे. दुसरीकडे मुंबईमध्ये सर्वसाधारणरीत्या ८ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होते. प्रत्यक्षात या वेळी मान्सून लांबल्याने मुंबईकरांना १३ ते १५ जून दरम्यान मान्सूनचे दर्शन होईल, अशी माहिती स्कायमेटकडून देण्यात आली.
>पूर्वेकडील राज्यांत
मुसळधार पावसाची शक्यता
मागील काही दिवसांपासून त्रिपुरासह लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील परिसर जलमय झाला आहे. परिणामी येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या २४ तासांत बांगलादेशमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. परिणामी येथील नद्या त्रिपुरात वाहत असल्याने येथे पूरसदृश परिस्थिती आहे.
२९ मे रोजी त्रिपुरासह पूर्वेकडील राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. परिणामी पुरास सामोरे जावे लागेल. बांगलादेश, आसाम, त्रिपुरा, मेघालय, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमधील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
>विदर्भाच्या तापमानात वाढ
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या, विदर्भाच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.
>राज्यासाठी अंदाज
२८ मे : विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
२९ मे : विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट येईल.
३०-३१ मे : विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
मुंबईसाठी अंदाज
२८ मे : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल-किमान तापमान ३४, २८ अंश राहील.
२९ मे : आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल-किमान तापमान ३५, २७ अंश राहील.
>बिहारमध्ये ३० मेनंतर पाऊस
बिहार आणि झारखंडमध्ये दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहील. ३० मेनंतर हवामानात बदल होतील. त्यानंतर दोन्ही राज्यांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वातावरण कोरडे असून, येथील तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.
>दक्षिणेकडील स्थिती अशी
गेल्या २४ तासांपासून विदर्भासह तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेशमधील काही भागात उष्णतेची लाट कायम आहे. दक्षिण कर्नाटक, आसाम, अरुणाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडूसह सिक्कीममध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल. विदर्भ, तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट कायम राहील.