प्रजासत्ताक दिनापासून मुंबई होणार कचराकुंडीमुक्त; राज्यातही राबविणार स्वच्छतेची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 04:11 AM2020-01-18T04:11:32+5:302020-01-18T04:11:50+5:30
केवळ मुंबईच नव्हेतर, महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचरा कुंडीबाहेर दिसलाच नाही पाहिजे
मुंबई : मुंबई शहरच नव्हेतर, संपूर्ण महाराष्ट्र राज्य कचराकुंडीमुक्त करण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. येत्या २६ जानेवारीपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. स्वच्छतेची फॅशन यावी, अशी इच्छा त्यांनी या वेळी व्यक्त केली.
मुंबई महापालकेमार्फत आयोजित ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२०’ या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. शाळा, हॉटेल, मंडई, रुग्णालय अशा ११ विविध गटांमध्ये आयोजित या स्पर्धेतील विजेत्यांना आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुंबईसह राज्यात चांगले रस्ते, चांगले पदपथ आणि स्वच्छ शहर भेट देण्याचा मानस त्यांनी या वेळी व्यक्त केला. आपली लोकसंख्या पाहता प्रत्येकाने १० फूट जागा कचरामुक्त केल्यास ही समस्या कायमची दूर होईल, असेही ते
म्हणाले.
केवळ मुंबईच नव्हेतर, महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचरा कुंडीबाहेर दिसलाच नाही पाहिजे, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी केले. मुंबईच नाहीतर, राज्यातील सर्व पालिकांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालिका आयुक्तांची बैठक घेऊन सूचना दिल्याचेही ते म्हणाले.
टाकाऊ वस्तूंचा अनोखा फॅशन शो!
पालिकेने कचरा व्यवस्थापन मार्गदर्शनासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात टाकाऊ प्लास्टीक आणि इतर वस्तूंपासून तयार केलेल्या अनोख्या फॅशन शोचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये मॉडेलनी पाण्याच्या प्लास्टीक बॉटल, कापडी पिशव्या, रद्दी पेपर आदींपासून बनवलेले ड्रेस घालून अनोखे रॅम्प वॉक केले. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ असा संदेश यातून देण्यात आला.