महापालिका उभारणार मुंबईत आणखी आठ रात्रनिवारे
By admin | Published: October 12, 2016 06:59 AM2016-10-12T06:59:03+5:302016-10-12T06:59:03+5:30
बेघर, घरापासून वेगळी झालेली मुले व वरिष्ठांकरिता आठ नवे रात्रनिवारे बांधण्याची जाग अखेरीस महापालिकेला आली आहे. रात्रनिवारे बांधण्याबाबत उदासीन
मुंबई : बेघर, घरापासून वेगळी झालेली मुले व वरिष्ठांकरिता आठ नवे रात्रनिवारे बांधण्याची जाग अखेरीस महापालिकेला आली आहे. रात्रनिवारे बांधण्याबाबत उदासीन असलेल्या महापालिकेवर उच्च न्यायालयाने टीका केल्यानंतर महापालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मात्र बेघरांच्या तुलनेत महापालिका बांधणाऱ्या रात्रनिवाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आखलेल्या मागदर्शक तत्त्वानुसार, १ लाख बेघरांसाठी १२५ रात्रनिवारे असणे बंधनकारक आहे. २०११च्या जनगणनेनुसार, एकट्या मुंबईत ५७ हजार बेघर आहेत आणि महापालिकेने अवघे ८ रात्रनिवारे उभारले आहेत. वास्तविक मुंबईत १२५ रात्रनिवाऱ्यांची आवश्यकता आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन रात्रनिवारे वरळी, धारावी, महालक्ष्मी, मालाड, अंधेरी आणि अन्य काही ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. मुंबईतील बेघरांच्या तुलनेने रात्रनिवारे अत्यल्प असल्याची बाब एका एनजीओने उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे निदर्शनास आणली. पालिकेच्या उदासीनतेवर न्यायालयाने अनेकवेळा ताशेरे ओढले. अखेरीस जुलैमध्ये महापालिकेने नवीन रात्रनिवारे उभारण्याबाबत ठोस पावले उचलू, असे आश्वासन न्यायालयाला दिले. ‘नवीन रात्रनिवारे मुलांसाठी आहेत. दुर्दैवाने मुंबईत सज्ञानांसाठी एकही रात्रनिवारा नाही. मुलांप्रमाणे तेही या समाजाचा महत्त्वाचा भाग आहेत,’ अशी माहिती मानवी हक्क कार्यकर्ते आर्या यांनी म्हटले. (प्रतिनिधी)