मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्याने मुंबईत आता पुनश्च हरिओम होणार आहे. त्यानुसार बेस्ट बसमध्ये आता शंभर टक्के प्रवासाला परवानगी असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित नागरिकच लोकलमधून प्रवास करू शकणार आहेत. तर महिलांना लोकल प्रवासाची बंदी करण्यात आली आहे. तसेच सर्व दुकान, रेस्टॉरंट, खाजगी कार्यालय (५० टक्के उपस्थिती) संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरु राहू शकतात. मात्र मॉल मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृह बंदच राहणार आहेत. सोमवारपासून हा सुधारित नियम लागू होणार आहे.
कोविडचा पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार राज्य सरकारने जिल्हा आणि शहरांची विभागणी केली आहे. या विभागणीकरुन लॉकडाऊनमध्ये शीतलता करण्यात आली आहे. तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये वैद्यकिय कर्मचारी, काही अत्यावश्यक सेवा तसेच महिलांना लोकल प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली होती. यात बदल करण्याचे अधिकारी स्थानिक आपत्ती निवारण प्राधिकरणाला दिले होते.
लोकल प्रवासाबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्राला लागू होईल, असे शुध्दीपत्रकही राज्य सरकारने प्रसिध्द केले. त्याप्रमाणे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी शनिवारी संध्याकाळी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये महिलांना लोकल प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. महामुंबईत आता फक्त वैद्यकिय कर्मचारी, राज्य सरकारने जाहीर केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.
उभ्याने प्रवास नाही...
लॉकडाऊन काळात बेस्ट बस गाड्यांमधील आसन क्षमतेच्या निम्म्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र, सोमवारपासून आसन क्षमतेच्या शंभर टक्के प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मात्र उभ्याने प्रवास करण्यास अद्यापही बंदी कायम असणार आहे. मुंबईत कोविडचा पॉझिटीव्हीटी दर ५.५६ टक्के आहे.तर, ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धता ३२.५ टक्के आहे. त्यामुळे मुंबईची तिसऱ्या श्रेणीत करण्यात आली आहे.
असे आहेत काही नवीन बदल...
- मुंबईत संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी असणार आहे. सकाळपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जमाव बंदी असेल.
- बायो बबलमधील चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. मात्र, संध्याकाळी पाचनंतर फक्त इनडोअर शुटींगला असेल.
- खासगी व सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. उत्पादने निर्यात होणाऱ्या लघु व मध्यम उद्योग, अत्यावश्यक सेवा, देशाच्या सुरक्षेशी संबधित उद्योगांना पूर्ण क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- निर्यात होणारे उत्पादने, अत्यावश्यक सेवा वगळता असलेल्या उद्योगांना ५० टक्के क्षमतेने काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र,कर्मचारी - कामगारांची वाहतूक स्वत: करायची आहे.
काय सुरु राहणार....
- सर्व दुकाने,आस्थापने संध्याकाळी चारपर्यंत सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापने दुकाने शनिवार, रविवार बंद राहतील.
- खासगी कार्यालये (अत्यावश्यक सेवा वेगळता ) - संध्याकाळी चारपर्यंत.
- सांस्कृतीक, सामाजिक करमणूक कार्यक्रम - क्षमतेच्या ५० टक्के संध्याकाळी चारपर्यंत. शनिवार रविवार बंदी.
- उपहारगृह संध्याकाळी चारपर्यंत आसनक्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी. संध्याकाळी चार नंतर फक्त पार्सल सेवा.
- सार्वजनिक उद्याने, मैदाने, सायकलिंग आणि मॉर्निंग वॉक परवानगी - पहाटे ५ ते रात्री ९
- मैदानी खेळ - पहाटे ५ ते सकाळी ९, संध्याकाळी ६ ते रात्री ९
- लग्नसमारंभ - ५० व्यक्तींची उपस्थिती, दोन तासांची अट रद्द.
- अत्यंसस्कार - २० माणसांची उपस्थिती.
- बांधकाम - बांधकामाच्या ठिकाणी कामगार उपलब्ध असल्यास किंवा बाहेरुन कामगार आल्यास संध्याकाळी चारपर्यंत
- व्यायाम शाळा, सलोन, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर - संध्याकाळी चार पर्यंत क्षमतेच्या ५० टक्के.
- ई कॉमर्स - सर्व सेवा