येत्या आठवड्यात मुंबई आणखी ‘ताप’णार

By admin | Published: February 20, 2017 07:00 AM2017-02-20T07:00:01+5:302017-02-20T07:00:01+5:30

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदवण्यात येत असून, शनिवारी कमाल तापमानाने कहर केला

Mumbai will get more 'heat' in the coming week | येत्या आठवड्यात मुंबई आणखी ‘ताप’णार

येत्या आठवड्यात मुंबई आणखी ‘ताप’णार

Next

मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईचे कमाल तापमान ३७ अंश नोंदवण्यात येत असून, शनिवारी कमाल तापमानाने कहर केला आहे. शनिवारचे मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंदवण्यात आले असून, वाढत्या कमाल तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबापुरीतले राजकीय वातावरणही तापले असून, गुरुवारी निवडणुकीचा निकाल आहे. तर दुसरीकडे आठवडाभर कमाल तापमानाचा पारा ३५ अंशावर राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, राजकीय वातारणासह तापलेल्या हवामानामुळे मुंबई आठवडाभर आणखीच तापणार
आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदवण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे.
मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात होत असलेल्या लक्षणीय वाढीमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. सलग तीन दिवस मुंबईचे कमाल तापमान ३७ अंशावर स्थिर आहे. शनिवारी कमाल तापमान ३८ अंश नोंदवण्यात आले आहे. समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत असून, ते तप्त होत आहे. परिणामी, तप्त वातावरणामुळे मुंबईच्या कमाल तापमानात भर पडत आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पूर्वेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगासह हवामानातील उर्वरित घटकांमुळे वातावरण तापत असून, आठवडाभर हीच स्थिती राहील, असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले असून, मतदानापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत तरी ‘ताप’दायक वातावरण कायम राहणार असल्याचे चित्र सध्या तरी आहे. (प्रतिनिधी)

ऊन, वारा आणि उकाडा : मुंबापुरीतली थंडी आता बऱ्यापैकी ओसरली आहे. आठवडाभरापूर्वी मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदवण्यात येत होते. परिणामी, रात्री काहीसा गारवा मुंबईकरांना जाणवत होता. मात्र आता थंडी ओसरत असतानाच उन्हाळ्याने चाहूल दिली आहे. मागील पाचएक दिवसांपासून प्रखर सूर्यकिरणांमुळे मुंबई चांगलीच तापत आहे. विशेषत: दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पडणारे ऊन मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही करीत असून, यात आता आणखी भर पडत आहे. महत्त्वाचे म्हणजे वाहणारा वाराही तप्त असल्याने मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसत आहेत.

Web Title: Mumbai will get more 'heat' in the coming week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.