Join us

ऑक्टोबर ‘हीट’ने मुंबई तापणार! कडाक्याच्या उन्हाच्या ‘झळां’मुळे  नागरिक त्रस्त 

By संतोष आंधळे | Published: October 06, 2022 9:26 AM

ऑक्टोबर महिना सुरू होऊन काही दिवसही झाले नाही तोच कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले आहे.

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: ऑक्टोबर महिना सुरू होऊन काही दिवसही झाले नाही तोच कडाक्याच्या उन्हाने नागरिक हैराण झाले आहे. कधी मळभ तर कधी कडक ऊन यामुळे नागरिकांना असह्य वाटू लागले आहे. मे महिन्यात ज्या पद्धतीने घामाच्या धारा शरीरावरून वाहत असतात. तसा काहीसा अनुभव सध्या मुंबईकरांच्या वाट्याला येत आहे. दरवर्षीच ऑक्टोबर हीटमुळे मुंबई तापत असते. मात्र, यावर्षी महिन्याच्या सुरुवातीलाच  उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागत आहे. या सगळ्या विचित्र तापमानामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्दी- खोकल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. दोन दिवसांपुरता का होईना हा त्रास जाणवत असला तरी नागरिक लक्षणाप्रमाणे औषधोपचार करून बरे होत असल्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

गेल्या काही वर्षांत हवामानात आणि तापमानात कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे.  अवकाळी पाऊस केव्हाही पडत आहे तर उन्हाचा पारा अचानकपणे वाढल्यामुळे दुपारची कामे नागरिक लवकरच आटपून घेताना दिसत आहे.  तसेच दिवसाच्या तापमानाबरोबर रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे. उन्हाचे चटके जाणवू लागल्याने शीतपेयांची मागणी प्रचंड वाढली आहे. मुंबई आणि आजुबाजूच्या शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम, रस्त्याची, मेट्रोची कामे आणि त्यात मोठ्या प्रमाणात वाहनांतून निर्माण हाेणारे प्रदूषण आणि धूलिकणांचा त्रास नागरिकांना होत असल्याचे दिसत आहे. या अशा परिस्थितीत नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर केल्यास ते या वातावरणापासून सुरक्षित राहू शकतील. 

इंडियन मेडिकल असोसिएशन, राष्ट्रीय सचिव  डॉ. जयेश लेले यांनी सांगितले की, विशेष करून मुंबईच्या या कडक उन्हात मोठ्या प्रमाणावर घाम येत असतो. त्या घामामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते. तसेच मधुमेहींनी या काळात जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यांनी उपाशीपोटी बाहेर पडू नये, चक्कर आल्यास साखर घेण्याऐवजी इलेक्ट्राेल पावडर घ्यावी. या काळात सर्वच नागरिकांनी संतुलित आहार घ्यावा. या काळात पाणीटंचाईचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. अशावेळी पाण्यात जिवाणू असण्याची शक्यता असल्याने पाणी उकळून प्यावे. तसेच शक्य झाल्यास नागरिकांनी ताक, फळांचा रस घ्यावा. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यास मदत होते.

बॉम्बे हॉस्पिटलचे औषधवैद्कशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले की, या उन्हाच्या त्रासामुळे चक्कर आलेल्या दोन रुग्णांना रुग्णालयात दाखल केले आहे. एक नागरिक बगिच्यात पाणी घालण्याचे काम करीत होता. उन्हाच्या प्रखर झळांमुळे ते चक्कर येऊन पडले.  त्यामुळे त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. दुसऱ्या रुग्णालाही चक्कर आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सध्याच्या विचित्र वातावरणाच्या काळात स्वतःच्या आरोग्याच्या विशेष काळजी घ्यावी.

चक्कर येणे, खूप पाणी प्या!

विशेष म्हणजे या कडाक्याच्या उन्हाच्या तापमानामुळे काही नागरिकांना चक्कर किंवा भोवळ येण्यासारखे प्रकार घडून आल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. वृद्ध नागरिकांनी उन्हाच्या वेळी बाहेर पडू  नये असू डॉक्टरांनी सुचविले आहे. या काळात  पुरेसे पाणी गरजेचे आहे.  या तापमानात तर चक्कर येणे, अशक्तपणाच्या तक्रारी जाणवू शकतात.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उष्माघात