मुंबै महोत्सवातून मुंबईचा नावलौकिक वाढविणार- अरविंद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 10:09 AM2023-12-03T10:09:39+5:302023-12-03T10:10:46+5:30
जीवनाधार फाउंडेशनने सामाजिक क्षेत्रांत फारच महत्त्वपूर्ण काम केले असल्याचे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी केले.
मुंबई : मुंबै महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाद्वारे समाजाचे ऋण व्यक्त करण्याचा प्रयत्न अत्यंत गौरवास्पद आहे. या निमित्ताने जीवनाधार फाउंडेशनने सामाजिक क्षेत्रांत फारच महत्त्वपूर्ण काम केले असल्याचे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी केले.
मुंबै महोत्सवाच्या संकेतस्थळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आयोजित करण्यात आलेल्या सातव्या ‘मुंबै महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे अनावरण सावंत याच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जीवनाधार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश खाडे, सचिव अनिता खाडे, रंगकर्मी व मुंबै महोत्सवाचे क्रिएटिव्ह हेड श्रीनिवास नार्वेकर, नाट्यनिर्मात्या व समाजमाध्यम समन्वयक सुप्रिया चव्हाण, हेमंत वीर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष राजेश खाडे म्हणाले की, ‘मुंबै महोत्सवा’चे वेगळेपण जपण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. यात अधिक वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आहे.
विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ व्यक्तींचा ‘मुंबै गौरव सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
मुंबै भूषण, मुलखावेगळी माणसे, संस्थात्मक पातळीवर महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या संस्थेला सामाजिक कृतज्ञता सन्मान आणि ‘जीवनाधार जीवनगौरव सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे.
‘मुंबै सायक्लोथॉन’ पर्यावरणपूरक सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ‘आगळावेगळा जोडी विशेष मराठमोळा पारंपरिक फॅशन शो’ हे या महोत्सवाचे आकर्षण तर ‘नाद’ हा फ्युजन बॅण्ड, लावणी कलाप्रकारातील ‘ये लावणीचे बोल कौतुके’ आणि ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे विविधरंगी कार्यक्रम आहेत.